महापालिकेसाठी अजित पवारांची मोट बांधणी
पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ : ‘‘पिंपरी चिंचवडचा विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस वर्षांपूर्वी दाखवलेल्या दूरदृष्टीचा परिणाम आहे,’’ असे अनेक जण म्हणतात. त्यात तथ्यही आहे. कारण, त्यांच्याच नेतृत्वाखाली सलग पंधरा वर्षे महापालिकेत सत्ता होती. २०१७ मध्ये ती भारतीय जनता पक्षाने काबीज केली. हे शल्य बोचत असताना राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि भाजपच्याच ‘संगतीनं’ पवार गेले. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पालकमंत्री म्हणून काम पाहू लागले. महापालिकेतही लक्ष घालू लागले. नुकतेच ‘जनंसवाद’ व ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ उपक्रमातून नागरिकांशी थेट संपर्क साधला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आखलेल्या या व्यूव्हरचनेतून ‘कार्यकर्त्यांसह मतांची मोट’ बांधण्याचा प्रयत्न करून विविध ‘लक्ष्य’ साधण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जात असल्याचे चित्र आहे.
महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक राजकीय स्थित्यंतरे, राजकीय कारभार शहराने पाहिला. १९८२ ते १९८६ आणि मार्च २०२२ पासून आतापर्यंत ही साडेआठ वर्षे प्रशासकीय कारभार होता. १९८६ पासून १९९८ पर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यात फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्वात आली. तेव्हापासून अजित पवार यांच्या हाती शहराची सूत्रे आली. त्यापूर्वी १९९१ मध्ये बारामतीचे खासदार असतानाही त्यांचा पिंपरी चिंचवड शहराशी संबंध आला. मात्र, २००२, २००७ व २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्ता आली. रस्त्यांचे रुंदीकरण असो वा नाशिक फाटा, भोसरीतील उड्डाणपूल असो. असे प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात झाले. मात्र, २०१४ मध्ये काही जणांनी त्यांची साथ सोडून भाजपची वाट धरली आणि २०१७ ला महापालिकेतील खुर्ची राष्ट्रवादीला सोडावी लागली. पंधरा वर्षे एकहाती सत्ता असलेल्या पवार यांना हा मोठा फटका बसला. हे शल्य त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बोचत होते. २०१७ ते २०२२ या काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष महापालिकेत बघायला मिळाला. मात्र, या पंचवार्षिकच्या उत्तरार्धात राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेसह राष्ट्रवादीतही फूट पडली. भाजपने शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या ‘संगतीनं’ अजित पवारही गेले. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व पालकमंत्री म्हणून काम पाहू लागले. महापालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय वर्चस्व कायम ठेवले. प्रत्येक कामाचा आढावा घेऊ लागले. आता तर त्यांनी सलग दोन दिवस पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकला. ‘जनंसवाद’ सभेच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. कारण, या सभेला सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ उपक्रम राबवून नागरिकांशी थेट घरोघरी जाऊन संपर्क साधला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आखलेल्या या व्यूव्हरचनेतून ‘कार्यकर्त्यांसह मतांची मोट’ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. शिवाय, विविध भागांवर ‘लक्ष्य’ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वबळाचे संकेत, पण तडजोडीचीही चर्चा
अजित पवार यांच्या सध्याच्या हालचाली पाहता महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे हे संकेत आहेत, असे बोलले जात आहे. त्यामुळे फुटीनंतर पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने दिसणार आहे. शिवाय, नाराज कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. मात्र, भाजपसोबत युती झाल्यास सर्व काही विसरून कार्यकर्त्यांनाही ‘तडजोड’ करावी लागणार आहे. कारण, राज्य व केंद्र सरकारमध्ये दोन्ही पक्ष साथ-साथ आहेत.