निवडणुकीमुळे इच्छुकांना समस्यांची ‘आठवण’

निवडणुकीमुळे इच्छुकांना समस्यांची ‘आठवण’

Published on

पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तशी इच्छुकांना मतदारांशी संबंधित प्रश्‍न, समस्या, अडचणी आठवू लागल्या आहेत. त्यासंदर्भात पत्रके काढून अधिकाऱ्यांना देऊन ‘आम्हीच तुमचे प्रश्‍न सोडवू’ अशा अविर्भावात हे इच्छुक मतदारांमध्ये मिरवत आहेत. यातील ‘जिवंत’ विषय म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला, सर्वांनीच दृष्टिआड केलेला आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘आठवण’ झालेला ‘दिवसाआड पाणीपुरवठा’ सुरळीत करणे आणि विविध समस्या सोडविण्याचा मुद्दा.

पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत पाणीप्रश्‍न गंभीर होता आणि आताही आहे. गळती आणि चोरीचे जवळपास चाळीस टक्के प्रमाण; शहाराच्या उंच-सखल भौगोलिक रचनेमुळे होणारा अनियमित व अपुरा पाणीपुरवठा आणि निगडी-प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रापासून दूरच्या भागात कमी प्रमाणात मिळणारे पाणी, ही त्याची प्रमुख कारणे आहेत.
यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पद्धतीने पाणी वितरणासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू केली. यामुळे तक्रारी घटल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ‘पूर्वीपेक्षा पुरेसे पाणी मिळतंय, पण दोन दिवस पुरेल इतके साठवून ठेवावे लागते,’ असे नागरिक म्हणतात. या ‘दिवसाआड’च्या अंमलबजावणीला सहा वर्षे पूर्ण होत आहेत.
दरम्यानच्या काळात आंद्रा धरणातून प्रतिदिन शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळाले आहे. तरीही दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय, नवीन बांधकामे किंवा गृहप्रकल्पांना पाणी देऊ शकणार नाही, पाण्याची व्यवस्था स्वतः करावी, अशा ‘नोट’वर बांधकामांना मंजुरी दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्वांना पुरेसे पाणी मिळणे, विविध सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे. मात्र, गेली सहा वर्षे काही अंशी विस्मृतीत गेलेला पाणीप्रश्‍न आणि दृष्टिआड केले जाणारे विविध प्रश्‍न आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही इच्छुकांकडून उपस्थित केले जात असल्याची चर्चा आहे.

निवेदने आणि ‘फोटोसेशन’
‘दिवसाआड’ पाणीपुरवठा संपूर्ण शहरात सुरू आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक रस्ते चिखलाने भरले आहेत. काही भागांत कचरा व सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यांची आठवण महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुकांना होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यांचे प्रभावक्षेत्र, निवडणूक लढविण्यासाठीचा संभाव्य प्रभाग, ते राहत असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे वा समस्या सोडविणे, आदींबाबतच्या मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले जात आहे. त्याबाबतचे ‘फोटोसेशन’ (छायाचित्र टिपणे) सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाव्य प्रभाग क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याची तत्परता दाखवली जात आहे. यातून विशिष्ट हेतू दिसून येत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com