सुमारे चार हजार निराधारांना वाढीव अनुदानाचा आधार

सुमारे चार हजार निराधारांना वाढीव अनुदानाचा आधार

Published on

प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. २४ : घरात कमवणारा व्यक्ती नसलेल्या निराधार नागरिक तसेच ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांसाठी सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या शहरातील हजारो लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने योजनेतील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्‍येक लाभार्थ्यास दीड हजार रुपयांऐवजी आता अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. वाढीव अनुदानाचा शहरातील चार हजार २०८ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.
निगडी येथील संजय गांधी निराधार योजना कार्यालयांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश भागांचा समावेश आहे. या कार्यालयांतर्गत तब्बल ३० गावे येतात. महापालिका हद्दीतील थेरगाव व वाकड हे परिसर मुळशी तालुक्याशी संबंधित असू येथील पात्र नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळतो. मावळ मतदारसंघातीलही काही गावांचा त्यामध्ये समावेश होतो. निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील अप्पर तहसिल कार्यालयाशेजारी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे कार्यालय आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. अद्याप वाढीव अनुदानाचे वाटप सुरू झाले नसले तरी लवकरच वाटप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही वाढ गरजू आणि निराधार नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडसह मावळ, मुळशी तालुक्यांतील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे.

लाभार्थ्यांची परवड
निगडीतील हे कार्यालय सध्या हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येते. त्‍यामुळे प्राप्‍त झालेले अर्ज घेऊन इथल्‍या कर्मचाऱ्यांना पुण्यात अर्ज दाखल करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्‍यानंतर मंजुरी मिळेपर्यंत अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यात उशीर तर होतोच. मात्र, कर्मचाऱ्यांचीही हेलपाटे मारून दमछाक होत आहे. मात्र, या योजनेच्‍या मंजुरीचा अधिकार हवेली तहसिलदारांकडेच आहे. त्‍यामुळे इतर कार्यालयाला त्‍याचा अधिकारी नसल्‍याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत. त्‍यामुळे, कर्मचाऱ्यांचे हे हेलपाटे थांबविणे आवश्‍यक आहे. अनेक वेळा लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान प्राप्‍त होत नसल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत. अपुऱ्या कागदापत्रांमुळे या अडचणी येत असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

वेळेवर अनुदान न मिळण्याची कारणे
- आधारकार्ड नसणे
- आधारकार्ड सक्रीय नसणे
- आधार कार्डवर पूर्ण नाव, पूर्ण जन्मतारीख, पूर्ण फोन नंबरसह माहिती अद्ययावत नसणे
- आधार कार्ड व फोन नंबर बँक खात्याशी लिंक नसणे
- लाभार्थ्याकडे स्वतः चा मोबाईल नंबर नसणे
- आधारकार्ड वरील व बँक खात्यावरील नावात तफावत असणे
- बँकेत स्वतःच्‍या नावावरील स्‍वतंत्र खाते नसणे
- संगणकीय प्रणालीनुसार लाभार्थ्याचे पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नसणे

मतदारसंघ निहाय लाभार्थ्यांची आकडेवारी
पिंपरी - १६१४
चिंचवड - १६१६
भोसरी - ९५८
मावळ - २०
एकूण - ४२०८


संजय गांधी निराधार योजनेच्‍या लाभार्थ्यांना वाढीव अडीच हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राप्‍त होणार असल्‍याची माहिती आहे. त्‍याचे वाटप थेट शासन स्‍तरावरून केले जाते. अद्याप आमच्‍यापर्यंत काही कळविण्यात आलेले नाही.
- चंद्रकला शेळके, सहायक महसूल अधिकारी, संजय गांधी निराधार योजना, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com