कामगारांच्या वाहतुकीला असुरक्षेची ‘धग’
पिंपरी, ता. २५ : हिंजवडी येथे कामगारांच्या बसला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाच्या दुर्घटनेला सहा महिने उलटले आहेत. तरी, कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ‘धगधगता’च आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधीने सोमवार आणि मंगळवारी भोसरी, मोशी, चिखली, निगडी, तळवडे, भुमकर चौक, डांगे चौक या ‘पिकअप पॉइंट’वर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कामगारांची वाहतूक करणाऱ्या काही वाहनांचे चालक मद्यपान करून, तर काही मोबाइलमध्ये रील्स बघत, एअरफोन वापरून मोबाइलवर बोलत वाहने चालवित आहेत. त्यामुळे हिंजवडीतील घटनेनंतरही कामगारांच्या सुरक्षेबाबत वाहतूक पोलिस, आरटीओ आणि संबंधित कंपन्याही गंभीर नसल्याचे दिसून आले.
पिंपरी चिंचवड शहरालगत तळेगाव, चाकण, भोसरी एमआयडीसी क्षेत्रांसह तळवडे आणि हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले आहेत. चाकण-६०७ एकर, तर भोसरी एमआयडीसी परिसर सुमारे साडेतीन हजार एकरावर विस्तारलेला आहे. या परिसरात आठ हजारहून अधिक प्लॉटधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे पाच हजारांवर लघुउद्योग कार्यरत आहेत. तसेच महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन अशा विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या परिसरात जाणाऱ्या-येणाऱ्या कामगारांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कंपन्यांनी खासगी बसची व्यवस्था केली आहे. याशिवाय शहरात काही टेम्पो ट्रॅव्हल्समधूनही कामगारांची वाहतूक केली जात आहे. पण, कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत कोणतीही यंत्रणा फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते.
- ‘सकाळ’च्या पाहणीत आढळलेल्या गंभीर बाबी
रस्त्यामध्ये बस उभी करून कामगारांची चढ-उतार. त्यामुळे वाहतूक कोंडी
काही चालकांचा बेदरकारपणा कायम. त्यामुळे अपघाताची भीती
मोबाइलवर रील्स किंवा चित्रपट पाहत बस चालवणारे चालक
या सर्व प्रकारांकडे वाहतूक पोलिस, आरटीओची डोळेझाक
कामगार वाहतुकीवेळी बस चालकांकडून नियम पायदळी
कामाच्या ठिकाणी जाताना मी ज्या बसमधून दररोज प्रवास करतो. तो चालक वेगाने बस चालवतो. काही वेळा तर मोबाइलध्ये रील्स बघत वाहन चालवतो. काही बोलायला गेलो, तर उद्यापासून घेऊन जाणार नसल्याचे धमकावतो. वेगाने गाडी चालवल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
- अभिषेक यादव, कामगार
आमची ने-आण करणारा चालक व्यवस्थित बस चालवत असला, तरी काही वेळा तो मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. आम्ही काम करून थकल्यामुळे कधी-कधी बसमध्ये झोपतो. त्यामुळे बऱ्याचदा चालकाकडे दुर्लक्ष करतो.
- मनेष भालेराव, कामगार
मी मागील चार वर्षांपासून दररोज कंपनीच्या बसने प्रवास करतो. पण, मला आजपर्यंत कधी वाहतूक पोलिस किंवा आरटीओने कोणती बस अडवल्याचे दिसले नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करावी.
- अनिकेत प्रजापती, कामगार
कामगारांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते. बसचालक वेगाने, मद्यपान करुन वाहन चालवत असेल, तर कामगार, नागरिकांनी तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
कंपन्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल, तर चालकांवर कारवाई केली जाईल. खासगी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड
कामगारांची वाहतूक करणारी वाहने
१,३२७ - मॅक्सी कॅब
१५,४८७ - बस
(माहिती स्रोत : पिंपरी चिंचवड आरटीओ)
PNE25V52612
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.