शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘व्हिजन@५०’

शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘व्हिजन@५०’

Published on

पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत शिक्षण विभाग पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करणार आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आणखी वाढणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘व्हिजन@५० शहर धोरण’ उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शहराचा विकास करताना प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टींना द्यावा? कोणत्या क्षेत्रांना महत्व द्यावे? येथील शिक्षण व्यवस्था कशी असावी? पर्यावरण उत्तम राहावे यासाठी काय उपाययोजना कराव्यात? अशा विविध विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींशी चर्चा केली जात आहे. कार्यशाळेतून आलेल्या सूचनांच्या आधारे शिक्षण विभागासाठी सर्वसमावेशक, विद्यार्थी-केंद्रित आणि दूरदर्शी धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार असून त्यामुळे पुढील पाच वर्षांत पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श उभा राहील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे - पाटील, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, प्रथम संस्थेच्या सहसंस्थापक रजिया फरीदा यांच्यासह आकांक्षा फाउंडेशन, सत्त्वा कन्सल्टिंग, संगात, किंडर स्पोर्ट्स, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, लीडरशिप इक्विटी, पाय जाम फाउंडेशन, टीच फॉर इंडिया, लेंड ॲण्ड हँड, युनिसेफ अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विचारमंथन कार्यशाळा
‘व्हिजन@५० शहर धोरणा’च्या अनुषंगाने विचारमंथन कार्यशाळा बुधवारी झाली. शहरातील शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे डेटा आधारित विश्लेषण, शालेय बाह्य मुले, शाळांमध्ये राबविलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील यशस्वी पद्धती, शिक्षण विभागासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, या क्षेत्रातील नवीन आव्हानांवर चर्चा झाली.

विद्यार्थ्यांचा सहभाग
महापालिका शाळांमधील पाच विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव आणि भविष्यात शाळांमध्ये पाहायला आवडणारे बदल याबाबत मते व्यक्त केली. डिजिटल साधनांचा वापर वाढविणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी करणे, क्रीडा व सर्जनशील उपक्रमांना अधिक महत्व देणे आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी भर दिला.

शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण, समावेशक शिक्षण मिळावे या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांच्या गरजा, शिक्षकांचे योगदान आणि समाजाची अपेक्षा लक्षात घेऊन धोरणात्मक आराखडा आखला आहे. शाळांसह संपूर्ण शिक्षण संस्कृतीत बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. हा आराखडा पुढील पाच वर्षांत शहराच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com