‘हवा’मान धोक्याचे; पाच महिने प्रदूषणाचे

‘हवा’मान धोक्याचे; पाच महिने प्रदूषणाचे

Published on

पिंपरी, ता. २८ : पिंपरी चिंचवड शहरात नोव्हेंबर ते मार्च हे पाच महिने सर्वाधिक प्रदूषणाचे ठरत असल्याचे पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून पुढे आले आहे. २०२४- २०२५ मध्ये या पाच महिन्यांत हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय-एअर क्वॉलिटी इंडेक्स) १०० च्या पुढे नोंदविण्यात आला. यातही नोव्हेंबर हा सर्वाधिक प्रदूषित महिना ठरल्याची कबुली महापालिकेने आपल्याच अहवालातून दिली आहे. शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ हवा कार्यक्रम राबविल्यानंतरही प्रदूषणाची पातळी वाढतच असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.

नोव्हेंबर ते मार्च या या महिन्यांदरम्यान प्रदूषण होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांचे प्रमाण तुलनेने वाढल्याचेही महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये धोकादायक असणाऱ्या ‘पीएम २.५’,‘पीएम १०’ या सूक्ष्म धूलिकणांचे हवेतील प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मानकानुसार हवेतील ‘पीएम २.५’ मायक्रोग्रामचे प्रमाण प्रति घनमीटर जास्तीत जास्त ४०, तर ‘पीएम १०’ (पीएम-पर्टिक्युलेट मॅटर) मायक्रोग्रामचे प्रमाण प्रति घनमीटर जास्तीत जास्त ६० असणे अपेक्षित आहे. मात्र, वर्षभराच्या सरासरीमध्ये या दोन्ही घटकांचे प्रमाण अधिक नोंदवले गेले आहे.

प्रश्‍न कठीण; उपाययोजना मात्र शून्य
शहरातील हवा प्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे महापालिकेनेच या अहवालात म्हटले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, रस्ते सुस्थितीत ठेवणे, वाहतूक नियंत्रण प्रणाली विकसित करणे, वाहतूक मार्गालगत हरित पट्टे निर्माण करणे या उपाययोजनांचा कृती आराखडादेखील महापालिकेने दिला आहे. मात्र, सध्या शहराची स्थिती पाहता त्याची अंमलबजावणी करण्यात महापालिका कमी पडत असल्याची स्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, त्यातून उडणारी धूळ, रस्त्यालगत पडलेला कचरा-राडारोडा, तोडण्यात येणारी झाडे यामुळे प्रदूषणात भरच पडत आहे.

‘स्वच्छ हवा’ कार्यक्रम राबवूनही प्रदूषण
प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देशपातळीवर घेण्यात येणारा ‘स्वच्छ हवा’ कार्यक्रम शहरातही राबविण्यात येत आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून वायू शुद्धीकरण प्रणाली, ड्राय मिस्ट फाउंटन प्रणाली, स्टेशनरी फॉग कॅनॉन हे उभारण्यात आले आहेत. तसेच रस्ते धुण्यासाठी ‘रोड वॉशर’ही घेतले आहेत. मात्र, यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता चांगली झालेली अहवालातून तरी दिसून येत नाही. तर, दुसऱ्या बाजूला महापालिका मात्र शहरातील प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गुणवत्ता मानांकन

हवा गुणवत्ता निर्देशांक हवेचा दर्जा संभाव्य आरोग्य परिणाम
( एक्यूआय)
० - ५० चांगला कमी जोखीम
५१ - १०० समाधानकारक संवदेनशील लोकांना श्‍वासाचा किरकोळ त्रास
१०० - २०० मध्यम प्रदूषित फुफ्फुसाचा त्रास व हृदयविकार असलेल्यांना, मुले व ज्येष्ठ नागरिकांना श्‍वास घेण्यास त्रास
२०१ - ३०० खराब दीर्घ कालावधी पर्यंत बाहेर असणाऱ्या नागरिकांनी श्‍वसनाचा त्रास, हृदयविकार असलेल्यांसाठी धोकादायक
३०१ - ४०० अत्यंत खराब कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या लोकांना श्‍वसनाचे आजार
४०१ पेक्षा अधिक गंभीर निरोगी लोकांनाही श्‍वसनाचे गंभीर आजार


महापालिका क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक

महिना - हवा गुणवत्ता निर्देशांक
एप्रिल २०२४ - ९६
मे २०२४ - ८०
जून २०२४ - ४१
जुलै २०२४ - ३५
ऑगस्ट २०२४ - ३७
सप्टेंबर २०२४ - ४७
ऑक्टोबर २०२४ - ७३
नोव्हेंबर २०२४ - १८९
डिसेंबर २०२४ - १२९
जानेवारी २०२५ - १६२
फेब्रुवारी २०२५ - १३३
मार्च २०२५ - १३१

प्रदूषण वाढविणारे घटक मानक वार्षिक सरासरी
नायट्रोजन डायऑक्साइड - ४० - २१.९
‘पीएम १०’ - ६० - ९७.८
‘पीएम-२.५’ - ४० - ४६
कार्बन मोनॉक्साइड - २ - १.१


शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी बीआरटी मार्गांचा विकास, रस्ते रुंदीकरण, वृक्षारोपण, सायकल ट्रॅक विकसित करणे यांसारख्या उपाययोजना पिंपरी चिंचवड महापालिका करत आहे. तसेच ‘स्वच्छ हवा’ कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com