चऱ्होलीत बिबट्याचा वावर; दोन बछड्यांचेही दर्शन

चऱ्होलीत बिबट्याचा वावर; दोन बछड्यांचेही दर्शन

Published on

पिंपरी, ता. २५ ः चऱ्होली बुद्रुक परिसरातील राही कस्तुरी अपार्टमेंटच्या मागील बाजूच्या शेतात बुधवारी (ता. २५) बिबट्याचे दोन बछड्यांचा मुक्त वावर दिसून आला. बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक रात्रीच्यावेळेस घराबाहेर पडायला घाबरत आहेत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चऱ्होली बुद्रुक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्या वावर मानवी वस्तीजवळ दिसून येत आहे. ७ ऑगस्ट दरम्यान सुनील काटे यांच्या शेतातील बाभळींच्या झाडावर दिसला. त्यानंतर वन विभागाने सापळा रचून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने वन विभागाला चकवा देऊन तेथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांतच इंद्रायणी नदी किनारी बिबट्याचे दर्शन झाले. एक सप्टेंबर रोजी एका सोसायटीच्या सीमा भिंतीवर बसल्याचे दिसून आला. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री कामावर जाणारे नोकरदार यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी शेतात जाण्यास आणि महिला घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने लोक घरातच राहणे पसंत करत असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. त्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे. वन विभागाने तत्काळ दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी किंवा त्याला पुन्हा जंगलात हुसकावून लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

काय आहेत मागण्या ?
- वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी
- बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा
- नागरिकांमध्ये जनजागृती करावी, आवश्यक सूचना द्याव्यात

गेल्या काही दिवसांपासून चऱ्होली बुद्रुक परिसरात नागरी भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने आवश्यक कारवाई करावी. जेणेकरून परिसरातील नागरिकांना या दहशतीमधून मुक्ती मिळेल आणि त्यांच्या जीविताचे संरक्षण होईल.
- निर्गुण थोरे, नागरिक, चऱ्होली

नदी किंवा जंगलात बिबट्याचा वावर असल्यास त्याला पकडण्याचा अधिकार आम्हाला नाही. नागपूर कार्यालयातून बिबट्याला पकडण्याची परवानगी घ्यावी लागते. पण, चऱ्होली परिसरात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत आहेत. नागरिकांनी जुना व्हिडीओ किंवा छायाचित्रांवर विश्‍वास ठेऊ नये. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
- अनिल राठोड, नियतक्षेत्र वन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com