आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरात उमटले श्री सूक्ताचे स्वर
पिंपरी, ता. २६ : आकुर्डीतील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये ललिता पंचमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला श्री सूक्त पठण सोहळा उत्साहात पार पडला. देवस्थान ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व श्री सूक्त पठणाच्या तपपूर्ती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि संस्कृती संवर्धन विकास महासंघ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामूहिक पठणात सातशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या एकसुरी पठणाने संपूर्ण मंदिर परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर निनाद निफाडकर, वैशाली देशखैरे व प्राजक्ता निफाडकर यांनी शंखनाद केला. व्यासपीठाचे संचालन अर्चना सोनार, सुषमा वैद्य, माधुरी कवी, ज्योती कानेटकर, माधुरी ओक व इतर महिला सदस्यांनी केले.
कल्पना क्षीरसागर यांनी ‘स्त्रीशक्ती : समाज परिवर्तनाची प्रेरक’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘महिलांमध्ये सृजनशीलतेचा अनमोल गुण आहे. हा गुण पुढील पिढ्यांमध्ये रुजविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. नवरात्र म्हणजे देवीच्या विविध शक्तींचे दर्शन असून या शक्तींचा उपयोग संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी करावा. शंखनाद, घंटानाद व मंत्रपठणातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे सकारात्मक ऊर्जा पसरते. सूक्तांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे विज्ञान दडलेले आहे.’ असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा ट्रस्टच्या वतीने विश्वस्त धनंजय काळभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आयोजक संस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले. देवीची आरती व प्रसाद वितरण करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या धार्मिक सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व संस्कृती संवर्धन विकास महासंघ विभाग यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते.