दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

Published on

पिंपरी : दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून मिरची पावडर, दोन कोयते आणि चार दुचाकी वाहनांसह एकूण दोन लाख ३९ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जुनी सांगवी येथे निशिगंधा अपार्टमेंटसमोर करण्यात आली. संतोष मुक्काप्पा पवार (वय ३०, रा. पारखे मळा, बाणेर), पियुष आनंद राजपूत (वय १८, रा. औंध), तेजस मनोहर हंसकर (वय १९, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी), आलोक सूर्यकांत खेत्रे (रा. औंध), अमोल संजय भोसले (वय २४, रा. जुनी सांगवी), विराज अधिकराव काटे (वय २०, रा. औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गुड्डया ऊर्फ आर्यन मोरे (रा. जयमालानगर, जुनी सांगवी) आणि शायद शेख (औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे जुनी सांगवी येथील एका दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आले होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार पसार झाले.

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक
पिंपरी : शेअर ट्रेडिंगमध्ये रोज १० ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक कोटी ५८ लाख नऊ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन रवी कुमार, स्वाती देशपांडे, दिवाकर आणि दहा बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना एका ॲप युआरएलच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के रोज खात्रीशीर नफा देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून त्यांनी फिर्यादीस वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण एक कोटी ५८ लाख नऊ हजार ४३१ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेवर आठ कोटी रुपये एवढा मुद्दल व नफा असल्याचे आमिष दाखवले. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम व नफा काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादीकडे एकूण जमा रकमेच्या २.८२ टक्के चार्जेसची मागणी करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जखमी
पिंपरी : अज्ञात भरधाव वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना वाकड येथे घडली. या प्रकरणी २९ वर्षीय जखमी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचा मित्र विशाल ओमप्रकाश पंजवानी (वय २५, रा. कोथरूड, पुणे) हे त्यांच्या दुचाकीवरून एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. ते मित्रांची वाट पाहत रस्त्यालगत दुचाकीवर बसले होते. दरम्यान, एका अज्ञात वाहनचालकाने उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हाताला व तोंडाला दुखापत झाली. तसेच, त्यांचा मित्र विशाल पंजवानी याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे करण्यात आली. आदित्य ऊर्फ सरकीट सुरेश आचारी (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडब्ल्यूडी मैदानात एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आदित्य आचारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन काडतुसे जप्त केली आहेत.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला लाकडी फळी, वीट आणि सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड परिसरात घडली. या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ‘मी आज हिला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत पतीने तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी फळी, वीट व सिमेंटच्या गट्टूने तोंडावर व कपाळावर मारून गंभीर जखमी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com