दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे वर्षभरात विविध उपक्रम
पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशन (डीबीएफ) तर्फे दिव्यांग बांधवांसाठी गेल्या वर्षभरात सांस्कृतिक, कलात्मक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे दिव्यांगांच्या कलागुणांना चालना मिळाली असून आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. समाजातील सक्रिय सहभागासाठी आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
नवरात्र विशेष :
दिव्यांग भवन फाउंडेशन आणि घरकुल अपंग साहाय्य संस्था यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) दिव्यांग बांधवांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात लहान मुलांसाठी चित्रकला व रंगभरण, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तसेच मंडला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्पर्धेसाठी लागणारी साहित्य व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली.
उत्स्फूर्त सहभाग :
या सर्व कार्यक्रमांना पालक, विशेष शिक्षक, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिव्यांग भवनातील हे उपक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी आणि सामाजिक एकात्मतेचे दालन ठरत आहेत.
उपक्रम :
- पर्पल जल्लोष : दिव्यांगांचा महाउत्सव - तीन दिवसांच्या या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो आणि विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रेक्षकांनीही कलागुणांना दाद दिली.
- साप्ताहिक गटसत्रे : आर्ट अँड क्राफ्ट, म्युझिक, प्ले ग्रुप सेशन्सद्वारे दिव्यांग मुलांना कलात्मक व सामाजिक संवादाचे व्यासपीठ मिळाले.
- डीबीएफ म्युझिकल ग्रुपची स्थापना : दिव्यांग बांधवांच्या संगीत कौशल्याला चालना देण्यासाठी स्थापन झालेल्या या ग्रुपचा सराव नियमितपणे दिव्यांग भवन येथे घेतला जातो.
- विशेष दिन व सण उत्सव : सांकेतिक भाषा दिनानिमित्त पथनाट्य, स्वातंत्र्य दिनाचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले गेले.
---