पिंपरी नवरात्र पुरवणी लेख
नवरात्र / विजयादशमी लेख
---
नवरात्रीच्या गळा
वनौषधींच्या माळा
नवरात्र उत्सव म्हटला की समोर येते दुर्गा माता. दुर्गा कवच. हे दुर्गा कवच ब्रह्मदेवाने मार्कंडेय त्रुषींना दिले. मार्कंडेय हे आयुर्वेद जाणणारे होते. मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत नऊ औषधी वनस्पतींना मानाचे स्थान आहे. त्या नऊ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला दिसतात. या वनस्पतींचा नवरात्राच्या दृष्टिने विचार केल्यास नऊ दिवसांच्या नऊ माळा असे म्हणता येईल. या नऊ माळांची, नऊ दुर्गांची, नऊ औषधी वनस्पतींची माहिती मांडण्याचा या प्रयत्न...
- विठ्ठल वाळुंज, भूगोल फाउंडेशन, मोशी
नवरात्र म्हणजे नऊ दुर्गा. नऊ दिव्य वनौषधी. त्या म्हणजे,
प्रथम शैलपुत्री च। द्वितीयं ब्रह्मचारिणी।।
तृतीयं चन्द्रघण्टेति। कूष्माण्डेति चतुर्थकम्।।
पंचमांश स्कन्दामातेति। षष्ठं कात्यायनीति च।।
सप्तमं कालरात्रीति। महागै्ारीति चाष्टमम्।।
नवकमलिनी सिद्धिदात्री च। नवदुर्गा: प्रकीर्तिता।।
उक्तान्येतानि नामानिराळा। ब्रह्मणैव महात्मना।।
नवरात्र सण साजरा करताना मार्तंड पुराणातील दुर्गा कवच डोळ्यांसमोर येतात. या कवचातून समजते की कोणत्या वनस्पतीमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, त्यांचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे. हा संस्कार किंवा संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रोत्सव.
निसर्गाने आपल्याला भरघोस दिले आहे. आपल्या संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्त्व दिले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड, संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा, वसुंधरेला हिरव्या शालुने नटवण्याचा, विश्वशांतीचा मार्ग स्विकारावा. निसर्गाचे आशीर्वाद घ्यावेत. कारण, वृक्ष आणि जीवसृष्टी यांचे घनिष्ट नाते आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे, वसुंधरचे, भूमातेचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे, हे समजून प्रत्येकाने आचरण करणे ही काळाची गरज आहे.
पहिली माळ ः नागवेली
वनरात्राचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. या दिवसापासून घटाला रोज एक माळ घातली जाते. ही माळ विविध वनस्पतीच्या फुलांची किंवा पानांची असते. या प्रत्येक वनस्पतीला आयुर्वेदिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक बाजूनी महत्त्व आहे. पहिली माळ नागवेल (विड्याची पाने) वनस्पतीच्या पानांची घातली जाते. प्राचीन काळापासून ही वनस्पती भारतीयांच्या नित्य आहारामध्ये असते. पूर्वी प्रत्येक घरी एक डब्बा असे. त्यात पाने आणि इतर साहित्य बारा महिने घरामध्ये असे. कारण पाने सुगंधी, तिखट, तुरट व उत्तेजक असून ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. श्वासनलिकादाह आणि हत्तीरोग यांत गुणकारी असतात. अलीकडील काळात हे कोणत्याही घरात आढळत नाही. नवरात्र या उत्सवात हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याच्या लागवाडीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि मानवी आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याची लागवड मोठ्या प्रमाणावर करावी आणि प्रत्येक घरी पूर्वीप्रमाणे याचा समावेश आपल्या आहारात करावा. आपले आरोग्य चांगले ठेवावे, याची शिकवण हा सण आपल्याला देत आहे.
दुसरी माळ ः ब्राह्मी, रुई, चाफा
- ब्राह्मी ः नवदुर्गा ब्रह्मचारिणी नावाने ओळखली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी वनस्पती. ही स्मरणशक्ती वाढविणारी वनस्पती असल्यामुळे हिला सरस्वती असेही म्हणतात. ब्राह्मीचे तेल प्रसिद्ध आहे. यामुळे शांत झोप लागते व केसांची वाढ उत्तम होते. अर्थातच शांत झोपेमुळे आपले आयुर्मान वाढते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मी रक्तदोषनाशक, स्वरयंत्राला पोषक असून पचनसंस्था व उत्सर्जन संस्थांना आरोग्यदायी आहे.
- रुई ः नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी घटाला रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालतात. ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही एक विषारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. या झाडाचे पान तोडल्यानंतर दुधासारखा घट रस (चिक) निघतो. यामध्ये दोन प्रकार असतात, जांभ्या फुलांची व पांढऱ्या फुलांची. जांभळ्या फुलांची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलांची दुर्मिळ असते. मानवी आरोग्य व शेतांतील पिकांसाठी हिचा औषधी उपयोग होतो. मूळव्याध, जामखिळी, नायटा, शरिरावरील बँड, निघून जाण्यासाठी याचा रस लावतात. पायात काटा किंवा काच घुसल्यास त्यावर रस लावतात. शरिरातील वेगवेगळे क्षार बाहेर टाकण्यासाठी हिचा उपयोग होतो. शेतातील वाळवी, हुमनी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रुईचा वापर होतो. तसेच पिकांवरील अनेक रोगांवर औषधीसाठी हिचा वापर होतो. हनुमान देवतेचा आवडता वृक्ष रुई आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे झाड निसर्गत: कोठेही उगवते व वाढते. याला पाणी द्यावे लागत नाही. याला जनावरे खात नाहीत. यामुळे ही वनस्पती आपण आता राखली पाहिजे.
- चाफा ः चाफा ही एक धार्मिक वनस्पती आहे. भारतात प्राचीन काळापासून मंदिरांच्या परिसरात हे झाड पाहायला मिळते. विविध रंगांची फुले येणाऱ्या चाफ्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या चाफ्याची माळ घटाला घातली जाते. या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. यामुळे आसपासचा परिसर सुगंधी राहतो. आयुर्वेदामध्ये या झाडाचे अनेक उपयोग सांगितले आहेत. चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो. चेहेऱ्यावरील यौवनपीटिका कमी होतात, त्वचा नितळ होते, तृष्णा, दाह व रक्तविकारात आराम होतो. यामुळे चाफा हा आपल्याला मानसिक व शारीरिक आराम देतो. यामुळे प्रत्येक घराच्या परिसरात चाफ्याचे एक झाड असलेच पाहिजे.
तिसरी माळ ः हालीम, झेंडू, कृष्णकमळ
- हालीम ः तिसरी नवदुर्गा म्हणजे चन्द्रघण्टेति अर्थात चंद्रघंटा. म्हणजेच चंद्रशूर, हालीम, चमसूर. हालीम शरीरास पोषक अशी अत्यंत दिव्य औषधी असून विटामिन सी, ए, इ, प्रोटीन्स, लोह, फायबर देणारी वनस्पती आहे. पालेभाजी म्हणूनही हिची ओळख आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, सांधेदुखी, हृदय विकार, रक्तशुद्धी, महिलांच्या मासिक पाळीचे विकार, दूध वाढविणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, अशा विविध गुणधर्मांनियुक्त अशी ही पालेभाजी आहे. जी पौष्टिक, कफनाशक, बलवृद्धी करणारी आहे. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात. या वनस्पतीच्या बिजास हलीम असेही म्हणतात. याचे लाडू बाळंतिणीला, आजारी व्यक्तीला दिले जातात.
- झेंडू ः ही एक औषधी आणि सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे. आपल्याकडे दसरा आणि दिवाळी सणांना याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कारण या सणांना झेंडूच्या फुलांच्या माळा प्रत्येक घराला, गाड्यांना, देवपूजेसाठी वापरल्या जातात. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार शेतकऱ्यांना मिळत असतो. या वनस्पतीचे अनेक उपयोग मानवी जीवनासाठी आहेत. घटाला तिसरी माळ ही झेंडूची घातली जाते. शहरांमध्ये झेंडूची फुले रोज वापरली जातात. यामुळे या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. झेंडूचे औषधी उपयोग खूप आहेत. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी वापरतात. या झाडाला वर्षभर फुले येतात. यामुळे प्रत्येकाने आपल्या अंगणात याची झाडें लावली पाहिजे. यामुळे घराचा परिसर प्रसन्न राहतो आणि आपल्याला त्याचे औषधी उपयोग करता येतात.
- कृष्णकमळ ः ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीला विविध रंगाची फुले येतात. निळ्या फुलांची माळ घटाला घातली जाते. या फुलाला कौरव-पांडव फुल असेही म्हणतात. कारण या फुलांच्या पाकळ्यांची रचना शंभर, पाच, तीन अशी आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाचे अनेक उपयोग सांगितले आहेत. कृष्णकमळ फुले चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी, नैराश्याचे परिणाम कमी करण्यासाठी हर्बल पूरक म्हणून काम करू शकतात. हे त्याच्या वाळलेल्या स्वरूपात किंवा अर्क म्हणून योग्य डोसमध्ये सेवन केले जाऊ शकते. कृष्णकमळ हे तणाव आणि डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते. या फुलाचे सौंदर्य आपल्याला मोहित करते. यामुळें मन प्रसन्न होते. याचा सुगंधही आपल्याला आनंद देतो. यामुळे ज्या घरासमोर हा वेल असेल तेथे शांती पूर्ण वातावरण रहाते. यामुळे सर्वांनी हा वेल आपल्या घरासमोर लावावा.
चौथी माळ ः कोहळा, मोगरा
- कोहळा ः चौथी नवदुर्गा म्हणजे कूष्माण्डेति चतुर्थकम्. अर्थात कुष्मांडा किंवा कोहळा. पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तांत रुपांतर होते. या प्रक्रियेत कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते. वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे. कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कोहळा फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास वरील सर्व फायदे मिळतात.
- मोगरा ः मोगरा ही अतिशय सुगंधी वनस्पती आहे. सर्वांना हवीहवीशी वाटणारी आणि प्रचंड आवडणारी वनस्पती आहे. हिला छोटे छोटे पांढरे असंख्य फुले येतात. या फुलांना खूप सुगंध मन मोहित करणारा असतो. मुली, महिला आपल्या श्रुंगारामध्ये मोगरा वापरतात. मोगऱ्याचा गजरा बनवून केसांमध्ये माळला जातो. प्राचीन काळामध्ये हे गजरे नेहमी वापरले जात होते. अलीकडील काळात लग्नसमारंभात याचा वापर होताना दिसतो. कारण आज मोगरा वनस्पती दुर्मिळ झाली आहे. हे झाड फार उंच वाढत नाही. यामुळे खूप कमी जागेमध्ये येते. पूर्वी प्रत्येक घरी अशी अनेक झाडे असत. यामुळे घराचे वातावरण प्रसन्न राहते. महिलांना शृंगार करण्यासाठी गजरेही बनवता येत होते. यामुळे आजही प्रत्येकाने मोगऱ्याचे एक तरी झाड आपल्या अंगणात लावलेच पाहिजे. नवरात्र हा सण महिला शक्ती, महिला सौंदर्य यांचा आहे. यामुळे हा सण आपल्याला मोगरा या वनस्पतीचे संवर्धन, जतन आणि मानवी जीवनातील उपयोग याची शिकवण देत आहे. मोगरा उपयोग परफ्युम व कानदुखी, अनेक थेरपींमध्ये, आर्युवेदात, अनेक रोगांवर उपयुक्त आहे.
पाचवी माळ ः अळशी, जास्वंदी
- अळशी ः पाचवी नवदुर्गा म्हणजे स्कंदमाता. तिलाच अळशी किंवा जवस असेही म्हणतात. ही वनस्पती महिलांच्या सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त अशी दिव्यौषधी आहे. यामध्ये ओमेगा तीन, ओमेगा सहा, प्रोटीन्स, विटामिन सी, इ, के, बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, मॅंगनेजीयम फॉस्फरस, आयर्न असे अनेक घटक द्रव्य आहेत. यामुळे आपल्या शरिराचे वात, पित्त, कफ संतुलित होतात. विशेष करून महिलांचे सर्व प्रकारचे विकार उदा. गर्भाशयातील गाठी, मासिक पाळीच्या समस्या, सांधेदुखी, पीसीओडी, चेहऱ्यावरील केस, सुरकुत्या अशा व्याधींचा नाश जवस किंवा अळशी करते. अळशीमुळे एंड्रोजन हार्मोन्स कमी होतात. आळशी अँटिऑक्सिडंट, ॲंटीकॅन्सर आहे. नियमितपणे अळशी खाल्ल्यास वरील सर्व विकार नाहीसे होतात.
- जास्वंदी ः पाहता क्षणी आपले मन मोहून टाकणारे फुल म्हणजे जास्वंद. निसर्गाने जास्वंदीच्या फुलाला अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. या फुलाला सुगंध नसतो, तरीही याचे सौंदर्य अप्रतिम आहे. जास्वंदीमध्ये लाल, पांढरा, गुलाबी, पिवळा असे विविध रंगाची फुले येतात. संपूर्ण भारतात जास्वंदीचे जवळपास २२५ प्रकार आढळतात. हे झाड झुडुपवर्गीय आहे. यामुळे प्रामुख्याने हे झाड आपल्याला उद्याने, घरासमोर, अंगणात लावलेले आढळते. आयुर्वेदामध्ये यांचे अनेक उपयोग सांगितले आहेत. केसांच्या सर्व आजारावर याचे तेल बनवून वापरले जाते. महिला याचा वापर केस धुण्यासाठी करतात. रक्तदाब कमी करणे, मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, पोट साफ करण्यासाठी; खाद्य पदार्थांमध्ये याचा उपयोग केला जातो. काही देशांमध्ये याची भाजी केली जाते. चहा आणि सरबताला रंग देण्यासाठी याचा वापर केला जाते. यामुळे प्रत्येक घरासमोर एक जास्वंदीचे झाड लावावे. घराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
सहावी माळ ः कात्यायनी, पारिजातक
- कात्यायनी ः कात्यायनी म्हणजे अंबाडी. ही एक पालेभाजी आहे. माल्व्हेसी कुटुंबातील वार्षिक किंवा बारमाही वनस्पती आहे. रोझेलशी (हिबिस्कस सबडारिफा) संबंधित आहे. अंबाडीची पालेभाजी रक्तदाब नियंत्रित करते. शरिरातील चरबी कमी करते. लो कॅलरीज डायट म्हणून ही भाजी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन ई, लोह, झिंक हे डोळ्यांसाठी उपयुक्त घटक असतात. भरपूर कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टीओपोरोसीसचा आजार होत नाही. अंबाडीची भाजी डियूरॅटीक द्रव्यांनी युक्त असते. त्यामुळे लघवीची जळजळ, उन्हाळे यांवर उपचारी आहे.
तथापि, अंबाडीची भाजी ऑक्सेलिक ॲसिडयुक्त असल्यामुळे मुतखडा असणाऱ्यांनी, ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये. पित्त, कफ तसेच गळ्याचे आजारांवर अंबाडीची भाजी उपकारक आहे.
- पारिजातक ः पारिजातक सर्वांच्या परिचयाचा असणारा वृक्ष आहे. वेदांपासून आजच्या साहित्यापर्यंत प्रत्येक लेखक, कवींनी या झाडाचे वर्णन केले आहे. शालेय अभ्यासक्रमात या झाडावर आधारीत एक कविता आहे. यामुळे शाळेपासूनच याची ओळख सर्वांना होते. आज सहावी माळ या पारिजातक वृक्षाच्या पानांची किंवा फुलांची घातली जाते. या झाडाला अतिशय सुगंधी अशी पांढऱ्या रंगाची छोटी छोटी असंख्य फुले येतात. पहाटे पहाटे ही फुले उमलतात आणि या फुलांचा सडा खाली पडतो. यामुळे पहाटेच्या वेळी याचा सुगंध परिसर मनमोहित करून टाकतो. फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाला खूप महत्त्व आहे. केसांचे आजार, पचन संस्था सुधारणे, रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, त्वचा विकार यावर हे उपयोगी आहे. या फुलांचा गजरासुद्धा महिला वापरतात. याच्या सुगंधामुळे मन प्रसन्न राहते. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरासमोर हे झाड असे. पहाटे या फुलांच्या सुगंधाने घर प्रसन्न होत असे. सर्वजण पहाटे उठत असत. यामुळे प्रत्येकाने एक झाड घरासमोर लावावे.
सातवी माळ ः काळरात्री, बेल
- काळरात्री ः हिला नागदवणी असेही म्हणतात. हिचे सामान्य नाव ‘बीच स्पायडर लिली’ आणि मराठी नाव ‘नागदवना’ आहे. ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही अत्यंत थंड वनस्पती आहे. शरिरांतर्गत रक्तस्त्राव, बवासीर, मुळव्याध सारख्या विकारात या झाडाची पाने काळ्यामिरीसोबत खाल्याने रक्तस्त्राव थांबतो. शरिरावर आलेली सूज, अल्सर, आतड्यांचे विकारांवर गुणकारी आहे. लघवीला होणारा त्रास, जळजळ, मुत्र विरोध अशा विकारात गुणकारी आहे. या वनस्पतीची लागवड घराच्या सभोवती केल्यास सकारात्मक उर्जा मिळते. हिच्या पानांचा चिक (दुध) विषनाशक आहे.
- बेल ः ही सर्वांना परिचित वनस्पती आहे. भगवान महादेवाची आवडती आहे. महादेवाची कोणतीही पूजा या वनस्पतीशिवाय पूर्ण होत नाही. यामुळे भारतीय संस्कृतीत या वनस्पतीला खूप जास्त महत्त्व आहे. घटाला सातवी माळ या वनस्पतीच्या पानांची घातली जाते. या पानांना त्रिदल असे म्हटले जाते. कारण या झाडाच्या एका देठाला तीन पाने असतात. हे त्रिदल महादेवाचे त्रिशूल समजले जाते. आयुर्वेदामध्ये या झाडाला महत्त्व आहे. रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये एक तरी बेलाचे झाड असे. आज हे झाड फक्त महादेवाच्या मंदिर परिसरामध्ये आढळते. या झाडाचे संवर्धन करण्याची गरज आहे. आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असलेले हे झाड प्रत्येकाने एक आपल्या घराच्या परिसरात लावावे.
आठवी माळ ः तुळस
- तुळस ः तुळस या वनस्पतीला भारतीय परंपरेत अतिशय पवित्र मानले आहे. यामुळे घटाला तुळशीच्या पानांची माळ घातली जाते. तुळशीला प्रत्येक घरासमोर स्थान दिले आहे. दररोज तिची पूजा करण्याची प्रथा आहे. कारण ती २४ तास ऑक्सिजन देते आणि डास, कीटक यांना आपल्या परिसरात येऊ देत नाही. हिचा सुगंध परिसर मनमोहक करून घरामध्ये प्रसन्नत्ता निर्माण करते. धार्मिक कार्यात तुळशीला खूप महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते. विठ्ठल पूजेमध्ये हिचा वापर केला जातो. माणूस मृत्यू पावल्यानंतर अंतिम संस्कार करताना तुळशीची पाने तोंडात ठेवली जातात. घरावरती तुळसीपत्र ठेवणे असे आपल्या समाजात रूढ आहे. याचा अर्थ तुळस हे सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे. आयुर्वेदामध्ये शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी, नायटा, कान, त्वचा, दात अशा जवळपास सर्वच आजारांवर प्रभावी गुणकारी आहे. तुळशीच्या बुंध्याजवळील मातीही विविध आजारांवर उपयोगी आहे. तुळशीच्या मंजुळा म्हणजे बी हे शक्तीवर्धक आहे. तिचे धार्मिक आणि पर्यावरण विषयक महात्म्य सर्वांनाच परिचित आहे. घरामध्ये सातत्याने सकारात्मक उर्जेची निर्मिती व वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते. तुळस अँटीकॅन्सर आहे. विटामिन सी, झिंक, अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरस, मुत्रवर्धक अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्यौषधी आहे. शरिरातील युरिक ॲसिड कमी झाले असल्यास तुळशीचा रस गुणकारी ठरतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा. सर्दी, पडसे, ताप, त्वचारोग, केसांची गळती, मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. रक्तवृद्धी, बलवृद्धी, हृदयाची मजबुती, मज्जा संस्था, स्मरणशक्ती अशा सर्वच बाबतीत तुळस अत्यंत गुणकारी आहे. तुळशीचे विविध प्रकार आहेत. तथापि सर्वच प्रकारची तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. यामुळे नवरात्र उत्सव तुळसीचे संवर्धन करण्याची प्रेरणा देतो.
- गुलाब ः गुलाबाचे वनस्पति नाव Rosa rubiginosa आहे. Rosa आणि Rosaceae या वंशात गुलाबांच्या अंदाजे 360 प्रजाती आहेत.
गुलाब हा काटेरी झुडुप प्रकारतील वृक्ष आहे. हा कडक उन्हामध्ये जोमाने वाढतो, यामुळे याची शेती ही उष्ण भागात चांगली होते...प्रत्येकाला प्रिय असणारे हे झाड आहे,कारण याची फुले खूप सुगंधी आणि सुंदर असतात...आज घटाला आठवी माळ ही गुलाबाच्या फुलाची किव्वा पानांची घातली जाते...गुलाबामध्ये विविध रंगाची फुले असतात. गुलाब हे प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक असतेंआपलें प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना लाल गुलाब भेट स्वरूपात देतात.या फुलांना खूप मागणी असतें.... पांढरा गुलाब हा शांती आणि मैत्रीचे प्रतीक मानला गेला आहे. याच प्रकारे विविध रंगाचे गुलाब हे विविध भावना आणि नाते यांचे प्रतीक मानले जाते...बागेमध्ये,गुलकंद, अत्तर करण्यासाठी,प्रेमाचे,मैत्रीचे,शांततेचे प्रतीक, घरादाराची शोभा वाढवण्याकरिता,डोक्यात माळण्यासाठी, शृंगार प्रसाधनासाठी,वगैरे तसेच गुलाबाच्या पाकळ्या खाद्यपदार्थत जेवणाची चव वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो...प्रत्येकाने गुलाबाची झाडे आपल्या घरी लावावीत.
नवरात्री नववी माळ नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।
नववी माळ ः शतावरी, लिंबू, कांचन
- शतावरी ः ही वनस्पती ॲस्परॅगसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲस्परॅगस रॅसिमोसस आहे. पूर्वी तिचा समावेश लिलिएसी कुलात केला जात असे. शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे. शतावरी या शब्दातच शतावरी चे गुणविशेष आहेत. म्हणजे शेकडो फायदे ज्या वनस्पतीचे आहेत अशी वनस्पती म्हणजे शतावरी. विशेषतः महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे. शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. शतावरी हॅप्पी हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे चिडचिडेपणा व ताणतणाव दूर होतात. रक्ताभिसरण, दृष्टीदोष, हृदयाची मजबुती, श्वसनाचे विकार, दमा, पचनसंस्था, आतड्यातील कृमींचा नाश, भूक वाढविणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करणे, बद्धकोष्ठता, अतिसार, बवासीर, मुळव्याध, वजन कमी होणे, चरबी कमी करणे, मधुमेह, कोरडी त्वचा सतेज बनवणे, शरीरावरील फोड, मुरमे यांचा नाश करणे असे असंख्य फायदे शतावरीच्या सेवनाने होतात. अर्थात शतावरी हे शरीराचे कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली, वीर्यवान, सुडौल, निरोगी, चिरतारूण असे आरोग्य प्रदान करते. हृदयाला बळ देते.
- लिंबू ः लिंबू हा रूटेसी कुलाच्या सिट्रस प्रजातीतील मध्यम उंचीचा वृक्ष आहे. ईडलिंबू, पपनस, महाळुंग, मोसंबे, संत्रे व चकोतरा या वनस्पतीही याच प्रजातीतील आहेत. लिंबू सर्वांना आवडणारे फळ आहे. अनेक ठिकाणी ते बाराही महिने घरामध्ये खाण्यासाठी वापरले जाते. कारण याचे मानवी शरिरासाठी खूप फायदे आहेत. या वनस्पतीच्या पानांची माळ नवव्या माळेला घटाला घातली जाते. लिंबू हे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारे झाड आहे. याची लागवड फळबाग या प्रकारमध्ये केली जाते. लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी झाडाला फळांचा बहार सुरू होतो. उन्हाळ्यात या फळांना खूप मागणी असते. यावेळी भावही चांगला मिळतो. अनेक जिल्ह्यामध्ये लिंबूचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न काढले जाते. आयुर्वेदमध्ये या झाडाचे अनेक फायदे सांगितले आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, पचन संस्था सुधारण्यासाठी, केसांच्या सर्व आजारावर तसेच केसांना बळकटी आणण्यासाठी, नायटे आणि डोक्यातील खरवड घालविण्यासाठी, त्वचेला चकाकी आणण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी, अन्न खाण्याची इच्छा होत नसेल तर लिंबाची चतकोर फोड सालासकट खाल्ल्यास उपयोग होतो. यामुळे हे एक तरी झाड सर्वांनी लावलेच पाहिजे.
- कांचन ः कांचन वृक्षाला आपटा असेही म्हणतात. प्रत्येक वर्षी या झाडाला ‘दसऱ्याच्या’ दिवशी गुलाबी रंगाची खूप फुले व हिरव्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. दसऱ्याला वृक्षाच्या संपूर्ण फांद्या तोडून लोकं घेऊन जातात. अक्षरशः हा वृक्ष पांगळा होऊन जातो. माणसे या वृक्षाला सोन्याचे झाड अर्थात आपटा वृक्ष समजून त्याची पाने ‘सोनं घ्या व सोन्यासारखा रहा’ असे म्हणून हातात देतात. परंतु वर्षभर हेवेदावेच करत राहतात. मग एवढा उठाठेव कशासाठी? एकतर आपटा वृक्ष दिसतो कसा? त्यांची पाने कशी असतात? हे तरी एकदा पाहून घ्या? आणि पाहिलाच तर त्याची रोपे तयार करून मग ती दसऱ्याच्या दिवशी मनुष्याला वाटा की जेणेकरून वृक्ष तरी लावले जातील. परोपकारी वृक्ष वाढतील व जागतिक तापमान कमी होण्यासाठी मदत होईल. हा वृक्ष फुलांनी खूप सजलेला पुन्हा दिसेल. या वृक्षाला एक फलक लावायला हवा, की हा वृक्ष आपटा नसून कांचन आहे, यास सोनं म्हणून तोडू नये. दसरा सणाला ‘आपटा’ या वनस्पतीला खूप महत्त्व दिले आहे. या दिवशी आपट्याची पाने देवाला वाहतात. सर्व पूजेमध्ये वापरतात. एकमेकांना आपट्याची पाने देऊन प्रेम व्यक्त केले जाते.
दसऱ्याला आपट्याचे महत्त्व
दसऱ्याला आपटा का वापरला जातो. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात.
‘अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण।
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम्।।
आपटा हा महादोषाचे निवारण करतो. एक आदर्श वृक्ष असून औषधीयुक्त आहे. याची पाने, फुले, फळे, बिया मूतखडा, पित्त, कफ, दाह इत्यादीवर गुणकारी आहे. जैव विविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आपटा सोने म्हणून वापरतात. आपटा हे झाड खडकाळ, मुरमाड, डोंगराळ, भागात येते. कारण याच्या मूळ्या खडकांना फोडतात. जमिनीतील पाणी दाखविण्याचे कार्य हे झाड करते अशी मान्यता आहे. हे झाड सरळ न वाढता वाकडे तिकडे वाढते. याला पांढरी फुले येतात. फुलांतून शेंगा येतात. कोठेही येणारे हे झाड मानवासाठी बहू उपयोगी आहे. यामुळे दसरा हा सण आपल्याला या झाडाचे संवर्धन करण्याची शिकवण देतो. म्हणून प्रत्येकाने एक आपट्याचे झाड दसऱ्याच्या मुहूर्तावर लावायला हवे.
आपट्याच्या पानांऐवजी रोपटे द्या
आज दसऱ्याला हजारो लोक आपट्याच्या पानांचा ‘सोनं सोनं’ म्हणून उदो उदो करतील आणि उद्या त्याच सोन्याचे कचऱ्यामध्ये रुपांतर होईल. काही लोक याचा कचरा गोळा करून जाळून टाकतील म्हणजे त्या पानांनी शोषलेला कार्बनडाय ऑक्साईड परत वातावरणात मिसळला जाईल. समजा ही झाडे तोडली नसती तर दरवर्षी या झाडांनी हजारो टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून वातावरण शुद्ध ठेवले असते. पक्ष्यांनी या झाडावर घरटी बांधून नविन पिढी वाढवली असती. एक झाड म्हणजे जैवविविधतेचे भंडार असते. त्यावर अनेक किटक, पक्षी, प्राणी व माणूस यांचे जीवन अवलंबून असते. पण दरवर्षी दुर्दैवाने आपण जुन्या चालीरिती, संस्कृती सांभाळत वातावरणाचा समतोल राखत परिस्थितीनुसार बदल करत होत. हे कुठे तरी थांबायलाच पाहिजे. फक्त हात जोडून आणि आपट्याचे वृक्ष देऊन म्हणा ‘शुभ दसरा’, ‘हॅपी दसरा!’ चला नविन प्रथेला सुरवात करूया!, पर्यावरणाचे संवर्धन करुया!, एक तरी झाड लावू या!
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.