औद्योगिक परिसरातील पाणी दरात वाढ

औद्योगिक परिसरातील पाणी दरात वाढ

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २९ ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडी) पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव या औद्योगिक परिसरातील पाणी दरात १२.७९ ते १५.२७ टक्के वाढ केली आहे. या क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील ग्राहकांना आता प्रति घनमीटर २०.७५ व २४.२५ रुपये इतका दर पडेल. यामुळे उत्पादन खर्चातील वाढ अटळ असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
ही वाढ एक सप्टेंबरपासून लागू झाली आहे. शहरात चिंचवड आणि भोसरी परिसरात साडेचार ते पाच छोट्या- मोठ्या हजार कंपन्या आहेत. यातील साडेतीन हजार कंपन्या एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात सुमारे सहा हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यातील चार हजार कंपन्यांना एमआयडीसी पाणी पुरवठा करते. एमआयडीसी पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात रोज सुमारे ६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. त्यामध्ये प्रामुख्याने दिघी, देहू, देहूरोड दारूगोळा कोठार आदी ठिकाणांचा समावेश आहे. तर, महापालिकेस एमआयडीसीकडून दररोज ३० दशलक्ष लिटर इतके पाणी दिले जाते. म्हणजे एकूण ९० दशलक्ष लिटर इतके पाणी पवना धरणातून एमआयडीसीकडून उचलले जाते. तर चाकण आणि तळेगाव एमआयडीसाठी आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. यातील सुमारे ४५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा उद्योगांना होतो. तर उर्वरित पाणीपुरवठा औद्योगीक क्षेत्रातील गावांना केला जातो.
----
काय होणार परिणाम ?
चाकण, तळेगाव आणि चिंचवड एमआयडी परिसरात सूक्ष्म-लघू-मध्यम आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये १० कामगारांपासून ते पाच हजार कामगार काम करतात. लघू-मध्यम उद्योगांकडून महिन्याला सुमारे २,३५० घनमीटर पाण्याचा वापर होतो. यावर सुमारे ५० हजार रुपये खर्च होत होता. आता पाण्याच्या दरात वाढ झाल्यानंतर यामध्ये आठ ते दहा हजार रुपये खर्च वाढणार आहेत. तर मोठ्या उद्योगांमध्ये महिन्याला सुमारे १६,२८० घनमीटर पाण्याचा वापर होतो. यावर साडेतीन लाख रुपये खर्च होत होता. आता दर वाढ झाल्यानंतर यामध्ये ५० ते ६० हजार रुपये खर्च होणार आहे.
-------------
मिळकत कर ३० टक्के वाढला, सेवा शुल्क तिप्पट वाढले. आता पाण्याचे दरही वाढवले आहेत. एमआयडीसीतील कंपन्या शासनाला विविध माध्यमांतून महसूल देते. त्याबदल्यात कहीच सुविधा मिळत नाहीत. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे आणि सुविधा नसल्यामुळे कुशल कामगार कामास येण्यास तयार नाहीत.
- प्रकाश धोंडगे, सहायक महाव्यवस्थापक, मनुष्यबळ संसाधन विभाग, एच डी ह्युंडाई कंपनी
----------
अधिकारी म्हणतात दरवाढ अपरिहार्य
एमआयडीसीने पाणी दरात २०१३ नंतर वाढ केली नव्हती, मात्र २०२२ मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने पाणीपट्टीत वाढ लागू केली. दरवर्षी सुमारे ५ ते १० टक्के वाढ सुरु आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशनान्वये २०२० पासून वीज दरात दरवर्षी सरासरी १० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------
अशी आहे स्थिती
एमआयडीसी ः ग्राहक ः पाणीपुरवठा (एमएलडी)
पिंपरी चिंचवड ः ३,५४६ ः ६०
चाकण ः ३,६०० ः ३०
तळेगाव एमआयडीसी ः ३५१ ः १३
-----------
पाण्याचे दर (प्रति एक हजार लिटर)
एमआयडीसी - पूर्वीचे दर - आताचे दर
पिंपरी चिंचवड - २१.५० रुपये - २४.२५
चाकण - २१.५० रुपये - २४.२५
तळेगाव - १८ रुपये - २०.७५
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com