गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी : ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तीन लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी गौरव कत्रुवार (रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निराली संघी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला गुंतवलेल्या रकमेवर नफा झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करून फसवणूक केली.
जुन्या भांडणातून मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणातून अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. या प्रकरणी चिखलीतील जाधववाडी येथील सतरा वर्षीय व्यक्तीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लकी चौधरी, मनीष प्रसाद, अमनकुमार यादव, अजय ओव्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला दांडियाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
चोरीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरून सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवडेनगर येथे घडली. या प्रकरणी चिंचवडेनगर येथील ४१ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर रजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा उघड्या दरवाजावाटे फिर्यादीच्या घरात शिरला. कपाटात ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
---