क्रिकेटने दिले आयुष्याचे धडे....

क्रिकेटने दिले आयुष्याचे धडे....

Published on

क्रिकेटने दिले जीवनाचे धडे!
महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांनी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी लक्ष्मण यांनी आपली क्रिकेट कारकीर्द उलगडून दाखवली. भारतासाठी खेळताना मिळालेल्या संधी, आव्हाने, पराभवाचे शल्य आणि विजयाचे क्षण अशा सर्व अनुभवांमधून क्रिकेटने जीवनाचे खरे धडे दिल्याचे त्यांनी सांगितले.

हा संवाद प्रश्नोत्तर स्वरुपात असा
लहानपणी अशी कोणती गोष्ट होती, ज्यामुळे तुम्हाला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली?

माझ्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, पण मी कधीही क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. करिअर म्हणून क्रिकेटला निवडण्याचा विचारही केला नव्हता. माझे आई-वडील डॉक्टर असल्याने, त्यांच्याप्रमाणेच मला डॉक्टर बनायचे होते; ते माझे आदर्श होते. मात्र, जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यात चांगली कामगिरी करू लागलो, तेव्हा संभ्रम निर्माण झाला. ११वी आणि १२वी मध्ये मला क्रिकेटच्या चांगल्या संधी मिळाल्या. १२ वीनंतर डॉक्टरकी की क्रिकेट, असा प्रश्न समोर आला. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला आवडेल ते करीअर निवडण्याची पूर्ण मोकळीक दिली. तो क्षण कलाटणी देणारा ठरला.

तुमची रणजी करंडक स्पर्धांतील कामगिरी खूपच चांगली आहे. तुमच्या रणजी पदार्पणाबद्दल काही सांगू शकाल?

मला तो १९९२-९३ चा काळ चांगला आठवतो. माझा पहिला सामना पंजाबविरुद्ध होता. पहिल्या डावात मी शून्यावर बाद झालो, तर दुसऱ्या डावात फक्त १७ धावा केल्या. पुढच्या वर्षी केरळविरुद्धही परिस्थिती फार वेगळी नव्हती. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो. यावेळी वरिष्ठ खेळाडू आणि मार्गदर्शकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यानंतर माझी १९ वर्षांखालील संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मी सर्वाधिक धावा केल्या, तर इंग्लंड दौऱ्यात दुसऱ्या क्रमांकावर होतो. या दोन मालिकांमुळे नवी दिशा मिळाली. त्यानंतर १९९४-९५ मध्ये पुन्हा रणजी मोसमात खेळलो आणि पाच सामन्यांत ५०० धावा केल्या.

पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली, तेव्हा भावना काय होत्या?

माझ्या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. १९९६ मध्ये माझी भारतीय संघात एका कसोटीसाठी निवड झाली होती. मी ज्या खेळाडूंना बघून मोठे झालो, ज्यांच्यासारखं खेळण्याचं स्वप्न पाहत होतो, त्यांच्यासोबत खेळायला मिळणार होतं. ते अक्षरशः स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव होता.

इडन गार्डन्सवर तुम्ही खेळलेल्या ऐतिहासिक २८१ धावांच्या खेळीची चर्चा आजही होते. त्या महत्त्वपूर्ण खेळीच्यावेळी तुमच्या मनात काय विचार सुरू होते?

तुम्ही जेव्हा खेळाडू म्हणून मैदानात असता, तेव्हा तुमची एक वेगळी मानसिकता असते. तुम्ही कधीही हार मानत नाही. भूतकाळात काय झाले याचा विचार करत नाही. भविष्यात काय होईल याचाही विचार करत नाही. त्या क्षणी सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यावर मात कशी करायची याचाच विचार आम्ही करत होतो. आम्ही त्याच एका विचारावर लक्ष केंद्रित करून खेळलो आणि यश मिळवले.

आजच्या तरुण खेळाडूंना काय संदेश द्याल?

जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे भूतकाळात न अडकता, आपण वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. कोणतेही ध्येय अशक्य नसते; ते साध्य करण्यासाठी फक्त आपल्यामध्ये ते शक्य करून दाखवण्याची तयारी आणि जिद्द पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची परीक्षा घेतली जाईल, अनेक अडथळे उभे राहतील. पण या अडथळ्यांचा आणि संकटांचा खंबीरपणे सामना करण्याची हिंमत स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही स्वत:शी प्रमाणिक राहिले पाहिजे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com