पदपथ पादचाऱ्यांचे; अतिक्रमण विक्रेत्यांचे

पदपथ पादचाऱ्यांचे; अतिक्रमण विक्रेत्यांचे

Published on

पिंपरी, ता. ३० : नागरिकांना सुरक्षित चालता यावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून शहरात ‘अर्बन स्ट्रीट डिजाइन’नुसार प्रशस्त पदपथ विकसित करण्यात आले. मात्र, आता ठिकठिकाणी अनधिकृत टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण पदपथच विक्रेत्यांनी बळकावले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने रस्ते अरूंद होत आहेत. त्यामुळे इतका खर्च नेमका कोणासाठी केला? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेतर्फे शहर आणि उपनगरांत ‘अर्बन स्ट्रीट डिजाइन’नुसार रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये सुसज्ज रस्ते, पादचारी मार्ग, सायकल मार्ग आणि वाहन पार्किंगसाठी जागा तयार करण्यात येत आहे. पण, आता चालण्यासाठी बांधण्यात आलेल्या पदपथावर पथारी चालकांनी कब्जा केला आहे. तसेच पानमसाला, चहा, वडापाव, भाजीपाला, खेळणी असे विविध व्यवसाय करणाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. या विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे. यातील काही व्यक्ती पदपथावर मध्यभागी दुकान मांडत आहेत. या सर्व स्थितीने चालण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. काही ठिकाणी रस्त्यावरच फळ विक्रेत्यांचे स्टॉल थाटले आहेत. यातील बहुतांश अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई होत नसल्याने उर्वरित व्यापाऱ्यांचे फावते आहे.

दरमहा ठराविक रक्कम...
शहरातील बहुतांश टपऱ्या, स्टॉल हे राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतःला नेते म्हणवणाऱ्या व्यक्तींनीच थाटले आहेत. या विक्रेत्यांकडून दरमहा ठराविक रक्कम घेतली जात आहे, असा आरोप काही विक्रेत्यांनी केला आहे. महापालिका अधिकारी कारवाईसाठी आल्यावर अधिकाऱ्यांना फोन लावून कारवाई थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जातो. बऱ्याच वेळा अतिक्रमण नियंत्रण विभाग येणार असल्याची माहिती या विक्रेत्यांना आधीच दिली जाते. परिणामी, विक्रेते तेथून निघून जातात अन् पथक गेल्यावर पुन्हा पथारीचालक आपला व्यवसाय थाटतात.

पथक शोधा अन् बक्षीस मिळवा
महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथक सायंकाळनंतर कारवाई करत नाही. त्सामुळे काही विक्रेते त्या वेळेनंतरच पदपथावर दुकान थाटतात. चार-पाच तास व्यवसाय करून ते दुसऱ्या दिवशी सायंकाळीच येतात. त्या वेळेत कारवाई होत नसल्याने या विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ‘‘सायंकाळनंतर अतिक्रमण कारवाईचे पथक शोधा अन् बक्षीस मिळवा,’’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया पादचारी व्यक्त करत आहेत.

शहरात दिवसेंदिवस अनधिकृत विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. नवीन पदपथावर तर रात्रीच्या वेळेस सर्रास अनधिकृत विक्रेते दुकान मांडून बसतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण, यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
- रवींद्र झेंडे, पादचारी

अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करण्यात आले आहेत. त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे सकाळ आणि सायंकाळी दोन शिफ्टमध्ये कारवाई करण्यात येणार आहे.
- अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग

या परिसरात अतिक्रमणे
- मोरवाडी चौक ते चिंचवड
- निगडी ते एलआयसी कॉर्नर
- नेहरूनगर ते यशवंतनगर रस्ता
- पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी परिसर
- निगडी प्राधिकरण
- पिंपळे गुरव
- पिंपळे सौदागर

Marathi News Esakal
www.esakal.com