‘ऑनलाइन’ शिकाऊ परवाना योजना गुंडाळली

‘ऑनलाइन’ शिकाऊ परवाना योजना गुंडाळली

Published on

पिंपरी, ता. १ : परिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना’ (लर्निंग लायसन्स) योजना गुंडाळण्यात आली आहे. तांत्रिक त्रुटी आणि माहिती गैरवापराचा दावा करत योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. परिणामी, नागरिकांना ऑनलाइन परीक्षेसाठी ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमातंर्गत परिवहन विभागाने जून २०२१ पासून ‘ऑनलाइन लर्निंग लायसन्स’ योजना सुरू केली. याअंतर्गत कार्यालयात न येता (फेसलेस) घरबसल्या ऑनलाइन अर्ज करुन मोबाइल किंवा संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देऊन शिकाऊ परवाना घेता येत होता. ही सुविधा नागरिकांना फायदेशीर ठरली. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत अनेकांनी वेळ, पैसा आणि आरटीओच्या रांगेचा त्रास टाळत या योजनेचा वापर केला.
मात्र, गेल्या आठवड्यात परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. प्रामुख्याने ‘आरटीओ’च्या फील्ड अधिकाऱ्यांनी तपास करून काही तांत्रिक व सुरक्षेसंबंधी त्रुटी निदर्शनास आणल्याचे सांगण्यात आले. तब्बल चार वर्षांनंतर विभागाला योजनेतील त्रुटी आढळल्यानंतर ऑनलाइन लर्निंग लायसन्स प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार परिवहन विभागाने ‘एनआयसी’ अर्थात राष्ट्रीय सूचना केंद्राला पत्र देऊन ‘ऑनलाइन लर्निंग लायसन्स’ चाचणी तात्पुरती बंद करण्यात आली. ही योजना बंद झाल्याने आता नागरिकांना ऑनलाइन परिक्षेसाठी आरटीओत यावे लागत आहे.

शिकाऊ परवाना घेणाऱ्यांची संख्या घटली
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात एक जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान लर्निंग लायसन्ससाठी एक लाख २० हजार ६३३ जणांनी अर्ज केले होते. यातील ७८ हजार ८६८ जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ही योजना बंद झाल्यानंतर १९ ते २९ सप्टेंबरपर्यंत सहा हजार ४३२ जणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले आहेत. यातील बहुतांश अर्ज हे योजना बंद होण्यापूर्वीचे आहेत.

- या त्रुटींवर बोट
आधार कार्डमधील माहितीमध्ये फेरफार होऊ शकतो
शिकाऊ परवान्याची चाचणी उमेदवाराशिवाय दुसऱ्या व्यक्तीने देता येते
‘एनआयसी’च्या सुरक्षा सॉफ्टवेअरला बायपास करून उमेदवाराशिवाय चाचणी देणे व पास होणे शक्य

- आताची प्रक्रिया
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून फी भरावी.
त्यानंतर आरटीओत ऑनलाइन परीक्षेसाठी स्लॉट निश्‍चित करावा
परीक्षेच्या दिवशी आरटीओ कार्यालयता येऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी
कार्यालयात ऑनलाइन परीक्षा द्यावी
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मोबाइलवर आलेल्या लिंकवरुन ‘लर्निंग लायसन्स’ डाउनलोड करावे

लर्निंग लायसन्स ऑनलाइन परीक्षा पद्धतीत त्रुटी आढळल्याने वरिष्ठ पातळीवरून या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आताही प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे, फक्त परीक्षेसाठी आरटीओ कार्यालयात यावे लागणार आहे. यासाठी कोणाही मध्यस्थीची आवश्‍यकता भासत नाही.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com