ॲप आधारित वाहतूकदार शिरजोरच
पिंपरी, ता. ५ : ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) निश्चित केलेले दर आधार दर मानावे लागणार आहेत. याबाबत परिवहन विभागाच्या आदेशानंतर काही कंपन्यांनी त्यांच्या ॲपमध्ये बदल केले. मात्र, इतर काही कंपन्यांनी अजूनही बदल न करता हा आदेश जुमानलेला नाही.
जिल्ह्यात ‘ओला’, ‘उबेर’ आणि ‘रॅपिडो’ यांसारख्या काही कंपन्या ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा देत आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे प्रादेशिक परिवहन विभागात सुमारे ९० हजार कॅब आणि दीड लाख रिक्षांची नोंद आहे. यातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त कॅब आणि रिक्षाचालक हे ‘ओला’, ‘उबेर’सारख्या ऑनलाइन ॲपला जोडले गेले आहेत. घरपोच सेवा आणि बसमधील गर्दी टाळण्यासाठी खासगी कॅबचा प्रवास सोयिस्कर ठरतो. ऑनलाइन बुकिंग सुविधेमुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे. नागरिकांना ॲपवर वेगळा दर दिसतो आणि प्रत्यक्षात जास्त दर आकारला जातो. त्यामुळे चालक व प्रवाशांमध्ये वाद होतात. आरटीएप्रमाणे दर देण्यासाठी काही संघटनांनी आंदोलनही केले होते. याबाबत परिवहन कार्यालयात संघटना आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठकही घेण्यात आली. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींना आरटीएचे दर आधार मानून दर ठरविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
--------
किमतीनुसार भाडेदर ठरणार
राज्यात २० मे रोजीच्या शासन निर्णयान्वये ॲप बेस वाहनांसाठी ॲग्रीगेटर पॉलिसी लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबत नियम अंतिम करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यानंतर वाहनांच्या किमतीनुसार ॲपबेस वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात येणार आहे. तोपर्यंत ॲपबेस वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६८ (१) मधील तरतुदीनुसार राज्यात रिक्षा व टॅक्सी यांचे भाडेदर संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे (आरटीए) निश्चित करण्यात येत आहेत. आरटीएने निश्चित केलेले दर आधार दर मानावेत असे आदेश दिले आहे.
---------
काय आहे आदेशात ?
- ॲपबेस कंपन्यांसाठी आरटीएने निश्चित केलेले दर आधार दर
- मागणी कमी असलेल्या वेळेत देण्यात येणारी सुटीचा दर फेरीच्या २५ टक्के
- मागणी असलेल्या वेळेत दर दीडपेक्षा जास्त पट नसावेत
- चालकांना एकूण भाडेदराच्या किमान ८० टक्के रक्कम मिळावी
---------
पुणे जिल्ह्यात आरटीए रिक्षासांठी १७ आणि कॅबसाठी २५ रुपये दर निश्चित केले आहेत. ॲपबेस सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आरटीएचे दर आधार दर मानून दर निश्चित करावेत.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.