दसरा सण मोठा ! नाही आनंदाला तोटा...

दसरा सण मोठा ! नाही आनंदाला तोटा...

Published on

पिंपरी, ता.१ ः विजयादशमी म्हणजे दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक. असत्यावरील सत्याच्या विजयाचा उत्सव. आपुलकीने सोनं लुटायचा आणि आनंदाचं तोरणं दारी बांधायचा. त्याच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी (ता.१) बाजारपेठांमध्ये नवचैतन्य पसरले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने, वाहन खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. दसऱ्याच्या दिवशी पूजनात महत्वाचे स्थान असलेली झेंडूची फुले, आपट्याची पाने, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. इलेक्ट्रिक वस्तू, वाहने, सोने यांचे आगाऊ बुकिंग करून दसऱ्याच्या दिवशी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. विजयादशमी निमित्त घर, वाहनांना झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली. त्यासोबतच तयार हार, नारळ, पूजेचे साहित्य आणि मिठाई यांचीही खरेदी करण्यात आली.

मंदिरांमध्येही गर्दी
शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये होमहवन करून पूर्णाहुती करण्यात आली. प्रथेप्रमाणे मंदिरांमध्ये आणि घरोघरी बसविण्यात आलेल्या घटांचे विसर्जन बुधवारी करण्यात आले. नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यात आला. महिलांनी आपला नऊ दिवसांचा उपवास सोडला. शेवटच्या माळेला देवीचे दर्शन घेऊन ओटी भरण्यासाठीही महिलांनी देवीच्या मंदिरामध्ये गर्दी केली.

खरेदीचा मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. हा मुहूर्त साधण्यासाठी दसऱ्याच्या पूर्वसंध्येपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत होती. दसऱ्यासाठी पूजेच्या साहित्याची खरेदी केल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा दुकानांकडे वळविला. अनेकांनी दसऱ्यानिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी सहकुटुंब गर्दी केली. त्यामुळे कापड बाजार फुललेले दिसून आले. दसऱ्याच्या दिवशी होणारी गर्दी पाहता इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आगाऊ बुकिंग करण्याकडे नागरिकांचा कल होता. त्यामध्ये स्मार्ट टिव्ही, स्मार्ट फोन, टिव्ही, डबलडोअर फ्रीज, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टिम यासारख्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून गुरुवारी (ता.१) म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घरपोच मागविण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. तसेच वाहन खरेदी, सोने खरेदी या खरेदीसाठीही नागरिक घराबाहेर पडलेले दिसले. दसऱ्यानिमित्त विविध वाहन व इलेक्ट्रिक शोरूम व सराफ बाजारांमध्येही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सची लयलूट दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com