ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पालिकेकडून विशेष कार्यक्रम
पिंपरी, १ ता. ः ‘महापालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतात. ज्येष्ठांचा सन्मान हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून, तो आपल्या दैनंदिन आचरणाचा भाग असायला हवा. त्यांच्या आशिर्वादानेच समाज अधिक बळकट होतो. त्यांच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन महापालिका समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी (ता. १) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे, माजी महापौर माई ढोरे, उषा मुंढे, दिनकर गावडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, संतोषी चोरगे, अनिकेत सातपुते, रेश्मा पाटील, विशाल शेडगे, मनोज मरगडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. समाज विकास विभागामार्फत दरवर्षी एक ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. यावेळी पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या २७ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘आनंद मेळावा’ या विशेषांकाचे प्रकाशनही झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक तज्ञांचे व्याख्यानही झाले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
-----