शहरात विजयादशमी उत्साहात
पिंपरी, ता. ३ ः घरोघरी करण्यात आलेले पाटीपूजन व शस्त्रपूजन, नैवेद्यासाठी करण्यात आलेला गोडाधोडाचा स्वयंपाक, खरेदीचा मुहूर्त असल्याने बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी, ‘सोनं घ्या सोन्यासारखे रहा’ असे म्हणत स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी वाटण्यात आलेले सोने, रात्री ठिकठिकाणी करण्यात आलेले रावणदहन अशा वातावरणात दसऱ्याचा सण शहरात उत्साहात पार पडला. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने विविध गृहपयोगी वस्तू, वाहने व सोनेखरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली.
खरेदीचा उत्साह
विजया दशमीच्या दिवशी शस्त्रपूजनालाही महत्त्व असते. त्यामुळे सकाळीच घरोघरी पाटीपूजन, शस्त्रपूजन तसेच वाहनांची पूजा करण्यात आली. घरांना, वाहनांना झेंडूचे हार व तोरणे लावण्यात आली. घरोघरी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करून सहकुटुंब मनोभावे पूजा केली. दसऱ्यानिमित्त पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी असा गोडाधोडाचा स्वयंपाकही करण्यात आला. सायंकाळी देवीच्या मंदिरातही नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आपले नातेवाईक, आप्तेष्टांना सोने म्हणजेच आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सोने खरेदीचा उत्साह
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे एक लाखांच्या वर गेलेले आहेत. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. याशिवाय सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडेही कल वाढला आहे. त्यामुळे सोन्याची वेढणी, कॉइन खरेदी करण्यात आले. दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, हार, हिऱ्याच्या अंगठ्या यांनाही मोठी मागणी होती. तसेच चांदीची वाढती किंमत पाहता चांदीही खरेदी करण्याचा ट्रेंड वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वस्तूंची खरेदी
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीचा सण येतो. त्यामुळे नागरिकांनी कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्मार्ट फोन, स्मार्ट वॉट, फ्रिज, टिव्ही तसेच गृहपयोगी वस्तूंचीही खरेदी करण्यात आली. त्यामुळे मॉल व शोरूम मध्ये मोठी गर्दी दिसून आली.
वाहन खरेदी
वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. यातील बहुतांश जणांनी वाहनांचे बुकिंग नवरात्रीतच केले होते. त्यामुळे बुक केलेल्या वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहक सहकुटुंब गाड्यांच्या शोरूममध्ये आले होते.
---
सोने खरेदीचा उत्साह यावर्षीही कायम होता. अठरा कॅरेट सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. कमी वजनाचे हलके दागिने खरेदी करण्याबरोबरच हिऱ्याचे कानातले, पेंडन्ट यांना जास्त मागणी होती. तसेच वेढणी, कॉइन यातही ग्राहकांनी गुंतवणूक केली.
- राहुल चोप्रा, संचालक, सत्यम ज्वेलर्स
--
दसऱ्याला चोख सोने तर खरेदी केले जातेच, मात्र यावर्षी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडेही नागरिकांचा कल होता. सोन्यामध्ये रोज वापरण्याचे कमी ग्रॅमचे दागिने नागरिकांनी खरेदी केले. ग्राहकांचा खरेदीसाठी प्रतिसाद खूप जास्त होता.
- राहुल सोनिगरा, संचालक, एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स, चिंचवड स्टेशन
-----