सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना अटक

सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना अटक

Published on

पिंपरी : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. ही घटना यमुनानगर येथे घडली. ऋषिकेश सुनील संकपाळ (वय २६, रा. निगडी), जाफर शामजान इराणी (वय ४३, रा. लोणी काळभोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी साठ वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला यमुनानगर येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. यामध्ये फिर्यादी यांच्या गळ्याला दुखापत झाली.

सेंट्रिंगचे साहित्य परत न करता फसवणूक
पिंपरी : दुकानातून नेलेले सेंट्रिंगचे साहित्य परत न करता व्यावसायिकाची १३ लाख ९१ हजार २२० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे घडली. या प्रकरणी पौरव चंद्रकांत नार्वेकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनंजय शांतिलाल जगताप (वय २८), अतुल तुकाराम बैताडे (वय ३५, दोघेही रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी काम करत असलेल्या फर्ममधून आरोपींनी १३ लाख ९१ हजार २२० रुपये किमतीचे सेंट्रिंगचे साहित्य भाडेतत्वावर नेले. ते साहित्य परत आणून न देता आरोपींनी फसवणूक केली.

वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी : वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने एका तरुणीची एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चिंचवडमधील केशवनगर येथे घडली. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी तरुणीसोबत संपर्क साधून त्यांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून एकूण एक लाख २० हजार ८०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली.

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ घडली. अलोक दिलीप पटेल (वय ३२, रा. चिंचवड) असे या अपघातात मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रणजीत हिरामण चौहान असे जखमीचे नाव असून त्‍यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धर्मेंद्र विश्वंभर सिंह (वय ५२, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रणजीत व त्यांचे मित्र अलोक हे दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अलोक यांचा जागीच मृत्यू झाला तर रणजीत जखमी झाले.

अमली पदार्थ बाळगले; नायजेरियन तरुणासह दोघांना अटक
पिंपरी : गांजा व एमडी हे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मूळच्या नायजेरियन तरुणासह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई नेरे दत्तवाडी येथे करण्यात आली. ऍडवीन अँथोनी फर्नाडीस (वय ३०) आणि एल्वीस चिमान्सो ॲझोओरा (वय ३४, दोघेही रा. एक्झरबीया सोसायटी, नेरे-दत्तवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. एल्वीस हा मूळचा नायजेरियन आहे. पोलिसांनी या आरोपींकडून ३८० ग्रॅम गांजा व १७ ग्रॅम एमडी असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केले आहे..
---

Marathi News Esakal
www.esakal.com