मराठी भाषा सप्ताहामुळे चांगले रसिक घडतील

मराठी भाषा सप्ताहामुळे चांगले रसिक घडतील

Published on

पिंपरी, ता. ३ ः ‘‘महापालिकेने आयोजित केलेला अभिजात मराठी भाषा सप्ताह हा मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल. या माध्यमातून चांगल्या कलाकारांबरोबर चांगले रसिकही घडण्यास मदत होईल,’’ असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने व श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहभागातून शुक्रवारी ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आयोजित केला आहे. त्याचे उद्‍घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, संगीता बांगर, प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते.

गोरखे म्हणाले, ‘‘अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताहानिमित्त महापालिकेने असा कार्यक्रम घेऊन एकप्रकारे इतिहास घडवला आहे.’’ भोईर व लाखे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. किरण गायकवाड यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com