दसऱ्याला वाहन खरेदीचा आनंद ‘दुप्पट’

दसऱ्याला वाहन खरेदीचा आनंद ‘दुप्पट’

Published on

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवरात्रोत्सवात आणि दसऱ्याच्या दिवशी तब्बल १० हजार ७२ वाहन विक्रीची नोंद झाली. जीएसटीचे दर १० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे त्याचा वाहन निर्मिती उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला असून वाहनांच्या किंमती १० हजारांपासून ते एक लाखापर्यंत कमी झाल्या. त्यामुळे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदी विक्रीचा आनंद तब्बल ‘दुप्पटी’ने वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा या शुभमुहूर्तांवर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. दसऱ्याच्या दिवशी अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यंदा नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी वाहन खरेदीला पसंती दिली. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरासह खेड, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान १० हजार ७२ वाहन विक्रीची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाच हजार २२० दुचाकींची नोंद झाली. गतवर्षी नवरात्रोत्सवकाळात १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान फक्त पाच हजार ३९४ वाहनांची नोंद झाली होती. यंदा केंद्र शासनाने वाहनांसह, दैनंदिन जीवनावश्‍यक वस्तूंवरील जीएसटीच्या दरात मोठे फेरबदल केले आहेत. नवीन जीएसटी कराची २२ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये छोट्या वाहनांवरील जीएसटी कर २८ टक्के वरून १८ टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांनाही मागणी
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ७३१ नव्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. गतवर्षी फक्त ३६४ वाहनांची नोंद झाली होती. यामुळे यंदा इलेक्ट्रिक वाहन खरेदीतही दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जीएसटी कपातीचा वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला असून यावर्षी वाहनांची विक्रमी विक्री होताना दिसून येत आहे. पेट्रोलवरील वाहनांना आम्ही एक्सचेंज ऑफर दिली असल्याने अनेकांनी त्याचा लाभ घेतला. इलेक्ट्रिक वाहनांची आता पाच वर्षांपर्यंत वॉरंटी वाढविली आहे. परिणामी, अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत.
- मनीष मोहिते, संचालक, जय माता दी ग्रीन

वाहन विक्रीत दरवर्षी १० टक्के वाढ अपेक्षित असते. पण, यंदा जीएसटी कपातीमुळे विक्रीत तब्बल दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड आरटीओत नवरात्रोत्सवात दहा हजारांवर वाहनांची नोंद झाली आहे.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ

कुठली वाहने स्वस्त ?
- ४ मीटर लांबीपर्यंतच्या आणि १२०० सीसी पेट्रोल इंजिन असलेल्या मोटारीवर २८ टक्के जीएसटी अधिक १ टक्के सेस ऐवजी फक्त १८ टक्के
- ४ मीटर लांबीपर्यंतच्या आणि १५०० सीसी डिझेल इंजिन असलेल्या वाहनांवर २८ टक्के जीएसटी अधिक ३ टक्के सेस ऐवजी फक्त १८ टक्के
- ४ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या वाहनांवर आणि १२०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या पेट्रोल वाहन आणि १५०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या डिझेल वाहनांवर ४० टक्के

वाहन खरेदी दृष्टिक्षेपात
वाहनांचा प्रकार - २०२४ - २०२५
दुचाकी - २,९०६ - ५,२२०
मोटार - १,८३७ - ३,९३९
मालवाहतूक - २४५ - ४३२
रिक्षा - ९१ - १५६
इतर - २२८ - ३२५

वर्ष - वाहन खरेदी
२०२२ - ४,९११
२०२३ - ६,९०९
२०२४ - ५,३०७

२०२५ - १०,०७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com