गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष; 
दोन कोटी दहा लाखांची फसवणूक

गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष; दोन कोटी दहा लाखांची फसवणूक

Published on

पिंपरी : गुंतवणुकीवर जादा नफा देण्याचे आमिष दाखवून एकाची दोन कोटी दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑनलाइनद्वारे घडला. या प्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी फिर्यादीला वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यामध्ये फिर्यादीच्या नावाचे बनावट इक्विटी अकाउंट सुरू केले. त्याद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतविलेल्या रकमेवर सहा कोटी ९४ लाख ११ हजार रुपयांचा नफा दाखवला. त्यानंतर ही गुंतवणूक केलेली रक्कम व त्या रकमेवरील नफा काढण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली असता गुंतविलेल्या व त्यावर नफा झालेल्या रकमेवर त्यांची फी व सेवा शुल्क भरावयास सांगितले. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या एकूण रकमेच्या नावाने एक कोटी २२ लाख २५ हजार रुपये व त्यावर फी च्या नावाने ४८ लाख ५८ हजार रुपये व शॉट टर्म कॅपिटल गेन टॅक्स ३४ लाख ७० हजार रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची एकूण दोन कोटी १० लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केली.

जादा परताव्याच्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची ४८ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑनलाइनद्वारे घडला. या प्रकरणी पिंपळे सौदागर येथील ५२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मी पांडा या नावाच्या व्यक्तींसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी हिने फिर्यादीशी संपर्क साधून स्टॉक मार्केटिंगमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर एका ॲपवर वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यावर ४८ लाख ३६ हजार ७८० रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर या रकमेचा परतावा व गुंतवणूक रक्कम असे ७६ लाख ३६ हजार रुपये झाल्याचे ॲपमध्ये दाखवले. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला सात हजार रुपये फिर्यादीच्या खात्यावर पाठवले. परंतु नंतर इतर रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती मिळाली नाही. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाली.

कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भोसरीतील सहल केंद्राजवळ करण्यात आली. रोशन विश्वासराव मारोडे (रा. फुलेनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.

किरकोळ कारणावरून पंधरा वर्षीय मुलाला दांडियाने मारहाण
पिंपरी : किरकोळ कारणावरून पंधरा वर्षीय मुलाला दांडियाने मारहाण करून जखमी केले. ही घटना चिंचवडमधील आनंदनगर येथे घडली. या प्रकरणी चिंचवड साईबाबानगर येथील पंधरा वर्षीय मुलाने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद उर्फ अँडी गायकवाड (रा. आनंदनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्याचा मित्र हे आनंदनगर झोपडपट्टी येथील रस्त्याने पायी जात असताना रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीला बाजूला होण्यास सांगितले. या रागातून आरोपीने स्टीलच्या दांडियाने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com