माघ शुद्ध दशमी सप्ताहात संतविचारांचा ‘भंडारा’
इंदोरी, ता. २७ ः जगद्गुरू तुकोबारायांचा अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने गेली ७० वर्षे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होणारा अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यावर्षी प्रथमच श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या सुमारे शंभर एकरच्या पटांगणात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान आणि माऊली महाराज कदम संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येणार आहे. २३ ते ३१ जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या नामयज्ञात संतविचारांचा नामघोष होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृतमहोत्सवी संजीवनी समाधी सोहळा, तपोनिधी नारायण महाराज देहूकर त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी प्राकट्यवर्ष, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत हा सोहळा होणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीत माउली महाराज कदम, श्री भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिकमहाराज मोरे, सुदाममहाराज भोसले, बापूसाहेब भेगडे, अनिल लोखंडे, सचिनमहाराज पवार, विठ्ठल शिंदे उपस्थित होते. शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती माऊली महाराज कदम यांनी दिली. या सोहळ्यात काकड आरती, गाथा पारायण व ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, संतचरित्र कथा, कीर्तने होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ५० गावांतील वारकरी या महाप्रसादासाठी दररोज एक लाख भाकरी देणार आहेत, असे कदम यांनी सांगितले.
माऊली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाने राज्यभरात सहा पारायण सोहळे मोठ्या स्वरूपात होणार असून, त्यात व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड अशी संकल्पना प्रत्येक सप्ताहात राबवून समाज जागृती देखील करण्यात यावी, अशी सूचना शिवाजीमहाराज मोरे यांनी केली.
अध्यात्माबरोबर पर्यावरण रक्षणही’
संतांच्या कार्याचा प्रसार व प्रचाराचे कार्य करणारे माऊली महाराज कदम यांच्या पाठीशी संत तुकाराम महाराज संस्थान व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे पाठबळ राहील व महाराजांच्या या कार्यासाठी तन-मन-धन आम्ही सदैव अर्पण करू. भंडारा डोंगराच्या पायथ्याला होणाऱ्या सप्ताह सोहळ्यासाठी पर्यावरण रक्षण ही संकल्पना राबविण्यात येईल व एक लाखापेक्षाही जास्त वड, पिंपळ, चिंच, लिंब अशा देशी वृक्षांची लागवड श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या चहूबाजूने करण्यात येईल, अशी ग्वाही श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

