तरुणांनो, पोलिस भरतीची तयारी करा
पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाची ३२२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून  अर्ज करता येणार आहेत.  
या भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ९७ जागा, महिला ९७, खेळाडू १६, प्रकल्पग्रस्त १६, भूकंपग्रस्त ६, माजी सैनिक ४८, अंशकालीन पदवीधर १६, पोलिस पाल्य १०, गृहरक्षक दल १६, अनाथ तीन जागा भरल्या जाणार आहेत.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो.  
या भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. शारीरिक आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

