अप्पर तहसीलच्या नव्या जागेला मंजुरी
पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयासाठी टाळगाव-चिखली येथे पाच एकर जागा निश्चित झाली आहे. महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या जागेला मंजुरी दिली आहे. या कार्यालयासाठी कायमस्वरुपी जागेची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. दरम्यान, याबाबत अधिक प्रक्रियेची प्रतीक्षा आहे, असे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.
नव्या जागेअभावी सध्या निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी भाडेतत्वावरून हे कार्यालय सुरू आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे कामकाजात अडचणी येत आहेत. दररोज शेकडो नागरिक रहिवासी, उत्पन्नासह विविध दाखल्यांसाठी येथे येतात. कार्यालयात सध्या फक्त आठ लिपिक, एक अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार यांच्यामार्फत कामकाज पार पडते. जागेअभावी दस्तावेज व साहित्य ठेवण्याची अडचण आहे. नव्या जागेची मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू न झाल्याने कार्यालय जुन्याच जागेत चालवावे लागत आहे. लवकरच नवीन जागेबाबत पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.

