विकासाप्रमाणेच प्रदूषणही वेगवान
अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः पिंपरी-चिंचवडच्या विकासाबरोबरच प्रदूषणाचाही वेग वाढत आहे. कारखान्यांमधील धूर, बांधकाम प्रकल्पांमधील धुळ, वाहनांचा धूर याशिवाय प्लास्टिकचा अतिवापर आणि वृक्षतोड शहरातील वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, अॅलर्जी, नेत्रविकार, लहान मुलांमध्ये अस्थमा आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयरोग वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
शहरात ठिकठिकाणी बहुमजली इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे. मेट्रो, रस्ते आणि गृहनिर्माण प्रकल्प विकासासाठी महत्त्वाचे असले तरी या नियोजनात पर्यावरणाचा विचार मागे पडत आहे. वृक्षतोड वाढत असल्याने हरित पट्टा झपाट्याने कमी होत आहे. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या निळ्या पूररेषेत बेकायदेशीर प्लॉटिंग करून जमिनींची विक्री केली जात आहे. त्यासाठी नदीपत्रात भराव टाकला जातो आणि नवीन रस्ते बनवले जात आहेत. यासाठीही झाडे तोडली जातात. त्यामुळे नदीचे नैसर्गिक पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात पुराचा धोका वाढत आहे.
महापालिका क्षेत्रात सध्या ५०० हून अधिक बहुमजली गृहप्रकल्प उभारले जात आहेत. राज्याबाहेरील बांधकाम व्यावसायिक कंपन्याही प्रकल्प विकसित करत आहेत. यात शासनाचे पर्यावरणपूरक नियम अनेकदा पाळले जात नाहीत. मध्यवर्ती भागात जेथे शेकडो सदनिकांचे प्रकल्प उभारले जातात, त्याच परिसरात आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) प्लांट उभारले जातात. यातून निघणारी धूळ आणि सूक्ष्म कणांमुळे लगतच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर शासनाने बंदी घातली असली तरी बाजारपेठांमध्ये त्यांचा वापर अजूनही सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात. त्यांचे विघटन न झाल्यामुळे पर्यावरणासाठी गंभीर समस्या निर्माण होते. प्रशासनाने वारंवार कारवाई आणि जनजागृती मोहिमा राबवूनही प्लास्टिकचा वापर कमी होत नाही, ही चिंतेची बाब आहे.
------
कॅरिबॅग वापरल्याने कारवाई
वर्ष /कारवाई झालेले विक्रेते
२०२१-२२ - ३१२
२०२२-२३ - ६२६
२०२३-२४ - २८३
--------------
सरकारमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण अधिकारी आणि लोकांनी निवडून दिलेले मंत्री काम करतात. समाजात स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणवणारेही अनेक जण आहेत. पण दुर्दैवाने, त्यापैकी कुणालाही खऱ्या अर्थाने पर्यावरण वाचवावे असे वाटत नाही.
- गणेश महामुनी, नागरिक
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

