कचराकुंड्यांच्या जागेवर रांगोळ्या काढून स्वच्छता संदेश

कचराकुंड्यांच्या जागेवर रांगोळ्या काढून स्वच्छता संदेश

Published on

जुनी सांगवी, ता.५ ः जुनी सांगवी, जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्यांच्याकडेला नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर कचराकुंडीच्या ठिकाणी रांगोळ्या काढून ‘कचरा टाका कचरापेटीतच’, ‘माझा परिसर, माझी जबाबदारी’, ‘प्लॅस्टिकमुक्त स्वच्छ परिसर घडवूया’ असे संदेश रांगोळ्यांतून देण्यात आले.
अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. मुख्य रस्ते, सार्वजनिक चौक, बसथांबे, शाळांच्या परिसरात आकर्षक व आशयपूर्ण रांगोळ्यांद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यात आला. आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रदीप टेंडर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अंकुश थिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक अधिकारी दीपक कोटियाना यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे व कर्मचारी सहभागी झाले.
या उपक्रमादरम्यान आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत घरगुती कचरा निश्चित वेळेत कचरा संकलन वाहनांत देण्याचे आवाहन केले. रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कचरा टाकण्याची चुकीची सवय बदलण्यासाठी या मोहिमेत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यास मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो, असा संदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com