प्लॅस्टिक बंदीबाबत महापालिकेची कारवाई सुरू
पिंपरी, ता. ६ : प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आता सक्रिय झाले आहे. प्लॅस्टिक वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम सकाळने ‘प्रदूषणाचे दूषण’ या मालिकेतून लोकांसमोर मांडले. त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक थर असलेल्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. या अधिसूचनेअंतर्गत पेपर किंवा ॲल्युमिनियमवर प्लॅस्टिकचा थर असलेले डिश, कप, प्लेट, वाडगे, कंटेनर, चमचे, ग्लास इत्यादी एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू पूर्णपणे बंदीच्या यादीत समाविष्ट आहेत. या निर्णयाचा उद्देश दैनंदिन कचऱ्यातील प्लॅस्टिकचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे हा आहे. कारण प्लॅस्टिकचे विघटन अत्यंत कठीण असून, त्यातून गंभीर पर्यावरणीय प्रदूषण निर्माण होते. अनेक वेळा हा प्लॅस्टिक कचरा जलाशयांमध्ये फेकला जातो किंवा जाळला जातो, ज्यामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण देखील वाढत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई हाती घेतल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी होणार दंडात्मक कारवाई
पहिल्यांदा उल्लंघन आढळल्यास ः ५,०००
दुसऱ्यांदा उल्लंघन आढळल्यास ः १०,०००
तिसऱ्यांदा उल्लंघन आढळल्यास ः २५,०००
(पुढील कायदेशीर कारवाई)
प्रभागनिहाय तपासणी मोहीम सुरू
पिंपरी चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांना दंड आकारणी व जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. दुकाने, बाजारपेठा तसेच मोठ्या किरकोळ केंद्रांवर नियमित तपासणी मोहीम राबवली जात आहे. तरी नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
महापालिकेकडून राबविण्यात आलेली प्लॅस्टिक बंदी मोहीम ही केवळ एक मोहीम नसून, ती पर्यावरणाच्या संरक्षणाशी निगडित आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा. स्वच्छ, सुंदर आणि प्लॉस्टिकमुक्त पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
प्लॅस्टिकचा वापर थांबवण्यासाठी महापालिका जनजागृतीबरोबरच तपासणी मोहिमाही राबवत आहे. बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून स्वच्छ, हरित आणि सुंदर शहर निर्मितीस हातभार लावावा.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

