नफेखोर व्यापारी ते संधीसाधू राजकारण्यांचे नवे ‘मॉडेल’

नफेखोर व्यापारी ते संधीसाधू राजकारण्यांचे नवे ‘मॉडेल’

Published on

आठवडे बाजारांचा ‘बाजार’

मालिका भाग - १

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ६ : शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी ठिकठिकाणी आठवडे बाजारांची संकल्पना राबविण्यात आली.
मात्र, आता हे आठवडे बाजार शेतकरी - ग्राहक केंद्रित उपक्रमाऐवजी राजकारणी, व्यापारी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचे कमाईचे साधन बनले आहे. शेतकरी ते ग्राहक नव्हे; तर नफेखोर व्यापारी ते संधीसाधू राजकारणी, असे नवे ‘मॉडेल’ आता आकाराला आले आहे.
गरजू शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि ग्राहकांनाही रास्त दरात भाजीपाला मिळावा या चांगल्या हेतूने आठवडे बाजार सुरू करण्यात आले. मात्र, शहराच्या चौकाचौकांतील हे बाजार आता दिवसाढवळ्या उघड उघड शेतकरी व ग्राहक दोघांचीही फसवणूक करत आहेत. बाजारांचे सर्वत्र पेव फुटले असून शहराच्या विद्रुपीकरणासह ते ग्राहकांची लुटमार करणारे ठरत आहेत.

आता कसे चालते कामकाज ?
- बाजाराच्या नावाखाली रस्ते अडवून सर्रासपणे बेकायदेशीर व्यापार
- शेतकऱ्याचा मुखवटा लावून व्यापाऱ्यांकडून माल चढ्या दरात विक्री
- ‘ताजा माल, थेट शेतातून’ या आमिषावर ग्राहकांची लूटमार
- शेतमालाची प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण नगण्य
- बहुतेक ठिकाणी फळे, भाज्यांची घाऊक बाजारातून खरेदी करून विक्री

पुढाऱ्यांच्या हाती नियंत्रण
या बाजारांचे खरे नियंत्रण काही स्थानिक राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या हाती गेले आहे. प्रत्येक स्टॉलसाठी ठरावीक हफ्ते घेतले जातात; तर काही ठिकाणी आयत्या ब्रॅण्डिंगसह राजकीय नेत्यांचे फलक आणि छायाचित्रे लावून प्रतिमा उजळवली जात आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीकडे व्यवस्थापन
रस्त्याच्या कडेला बिनधास्त पसरविलेले स्टॉल, कचऱ्याचे ढिगारे, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत वीजजोड या सगळ्यामुळे शहराच्या सौंदर्य आणि स्वच्छतेवर गदा येत आहे. काही ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे कार्यकर्ते या बाजारांचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. रस्ता अडवून तंबू उभे करणे, मालवाहतुकीचे टेम्पो रस्त्याच्या मधोमध उभे करणे अन् हटकल्यास अरेरावी, उद्धटपणा, शिवीगाळ व भांडणाचे प्रकार सर्रास घडत आहेत. परंतु, नागरिकांना त्रास होऊनही कोणी आवाज उठवायला धजावत नाही.

व्यापाऱ्यांच्या नोंदी नाहीत
आठवडे बाजारात किती उत्पादक शेतकरी सहभागी आहेत, अन्य विक्रेते नक्की कोण?, त्यांच्याकडे कोणता परवाना आहे? याबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासन अथवा पणन महामंडळाकडे नाही. प्रत्येक आठवडा बाजाराची नोंद, परवानगी प्रक्रिया आणि खऱ्या शेतकऱ्यांचा सहभाग याबाबत पारदर्शक यंत्रणा कार्यरत नसल्याने बाजारात मनमानी चालू आहे.

मूळ संकल्पना काय ?
देशात शतकानुशतके सर्वत्र आठवडे बाजार किंवा बाजारहाट, हफ्ता बाजार ही व्यापार पद्धतीची संकल्पना चालत आली आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत असे. शेतमालाची थेट विक्री होऊन मध्यस्थ कमी होऊन सामाजिक एकताही वाढत असे.


शेतकऱ्यांच्या नावावर नागरिकांची फसवणूक होत आहे. शहराचा चेहरा विद्रूप होत आहे. वाहतूक कोंडी वाढत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालायला हवे. या मनमानी व फसव्या बाजारावर कोणाचेही नियंत्रण नाही.
- अनिता मरळ, रहिवासी, थेरगाव

आमच्याकडे सर्वाधिक आयटीयन्स वास्तव्यास असल्याने या सर्व बाजार संयोजकांनी आयटीयन्सना लक्ष्य करत फसवणूक सुरू केली
आहे. शेतकऱ्यांचा माल म्हणून तेही खूश होत वाटेल त्या चढ्या भावाने भाजीपाला खरेदी करत आहेत. त्यामुळे या रॅकेटचे चांगलेच फावत आहे.
- सुहास शिंदे, रहिवासी, वाकड

WKD25A09775

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com