असंघटित कामगार नोंदणीला मुहूर्त केव्हा ?

असंघटित कामगार नोंदणीला मुहूर्त केव्हा ?

Published on

पिंपरी, ता. ८ ः पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक, घरेलू कामगार, फेरीवाले, हमाल, कंत्राटी कामगार यांसारख्या असंघटित क्षेत्रातील हजारो जणांची अद्याप नोंदणी झालेली नाही. परिणामी त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्याचे आदेश दिला आहे, मात्र प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नसल्याची असंघटित कामगारांची खंत आहे.
बहुतेक कामगार रोजंदारीवर काम करतात. त्यांच्यासाठी निश्चित वेतन, आरोग्य विमा, निवृत्तिवेतन, अपघात विमा यांसारख्या सुविधांचा अभाव आहे. शासनाने ई-श्रम पोर्टलद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी जनजागृतीअभावी आणि स्थानिक पातळीवर पुरेशी मदत नसल्याने अनेक कामगार नोंदणीपासून वंचित आहेत. स्थानिक प्रशासनाने मोहिमा राबवून नोंदणी प्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. यासाठी विशेष पथके तयार करून प्रत्येक वस्तीत, बाजारपेठेत व औद्योगिक भागात नोंदणी शिबिरे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र, शासन प्रत्यक्ष कार्यवाही करीत नाही.
---------

उद्योगनगरीतील असंघटित कामगार
- घरेलू कामगार ः ९५,०००
- इतर बांधकाम कामगार ः ६७ हजार
- फेरीवाले ः १९ हजार ७००
- रिक्षाचालक ः ४४ हजार १४२
- इतर ः २,०००,००
---------

असंघटित कामगारांचे प्रमुख गट

- वाहतूक ः रिक्षाचालक, टॅक्सीचालक, ट्रकचालक, डिलिव्हरी बॉय, लोडिंग-अनलोडिंग करणारे हमाल
- घरेलू ः स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे, मुले सांभाळणे, वयोवृद्धांची सेवा करणाऱ्या महिला
- बांधकाम ः मिस्त्री, मजूर, सेंट्रिंग कामगार, रंगारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर
- फेरीवाले आणि लघुउद्योजक ः भाजीविक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, हातगाडीवाले, पदपथावरील छोटे विक्रेते
- कंत्राटी व तात्पुरते ः सरकारी, महापालिका किंवा खासगी कार्यालयांमधील कंत्राटी कर्मचारी
- शेती व ग्रामीण क्षेत्र ः शेतमजूर, कृषी कामगार, पशुपालक, साखर कारखान्यातील हंगामी कामगार
- इतर असंघटित व्यवसायातील ः नाभिक, सुतार, धोबी, माळी, शिंपी, ऑटो गॅरेजमधील मेकॅनिक, बांधकाम साहित्य वाहक

-----------
केंद्राच्या योजना

ई-श्रम पोर्टल योजना
- असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना १२ अंकी यूएएन कार्डचे वाटप
- या कार्डच्या आधारे विविध सरकारी योजनांचा थेट लाभ

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- १८ ते ४० वर्षे वयोगटातील असंघटित कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० पेन्शन
- मासिक ५५ ते २०० रुपये इतके योगदान कामगाराकडून; तितकेच सरकारकडून जमा

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- वार्षिक हप्ता २० रुपये
- अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व झाल्यास २ लाख, अंशतः अपंगत्वास १ लाख रुपये

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

- वार्षिक हप्ता ः ४३६ रुपये

- मृत्यू झाल्यास कुटुंबास विमा रक्कम ः २ लाख रुपये
---
अटल पेन्शन योजना
- असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन सुविधा
- वय वर्षे ६० नंतर दरमहा १,००० ते ५,००० रुपये

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्मान भारत)
- गरीब आणि असंघटित क्षेत्रातील कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा
----

राज्य शासनाच्या योजना

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ योजना
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शिक्षण साहाय्य, प्रसूती लाभ, वैद्यकीय मदत, गृहकर्ज, साधनसामग्री खरेदी अनुदान, मृत्यू साहाय्य आदी सुविधा.

महात्मा फुले जन आरोग्य योजना
- असंघटित क्षेत्रातील व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी मोफत रुग्णालयीन उपचार.

अपघात भरपाई योजना
- कामावर झालेल्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास तत्काळ आर्थिक मदत.

कामगार विमा व शैक्षणिक साहाय्य योजना
- मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, मुलींना शिष्यवृत्ती, कौशल्यविकास प्रशिक्षण.

-----
संघटित कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरकारने आतापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. नोंदणीच नसल्यामुळे योजनांचा लाभ मागण्याचा अधिकार आम्हाला उरला नाही. आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा ?
- लक्ष्मण सरडे, असंघटित कामगार
------

पती कमावत नाही. त्यामुळे मला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. तुटपुंज्या रकमेवर मिळेल ती कामे करावी लागतात. नोंदणी कशी करायची याची माहिती नाही. सरकारकडून काहीच मिळत नाही. कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आहे.
- शांताबाई वाघमारे, घरेलू कामगार
-----------

ई-श्रम पोर्टलची माहिती घेऊन नोंदणी केली. योजनांच्या लाभासाठी कार्यालयात हेलपाटे मारले. प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. कार्यालयात काहीही उत्तरे दिली जातात. त्यामुळे सरकारची कुठलीच योजना नको, सरकार दिशाभूल करतेय.
- आकाश लोखंडे, रिक्षाचालक
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com