वारकऱ्यांचे कार्तिकीचे स्नान दूषित पाण्यातच

वारकऱ्यांचे कार्तिकीचे स्नान दूषित पाण्यातच

Published on

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ ः कार्तिकी वारी अवघ्या तीन दिवसांवर असताना इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ता चिंताजनक बनली आहे. ‘एसटीपी’ कार्यान्वित असूनही अनेक भागांतील नाल्यांतून शुद्धीकरण न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणीचे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. परिणामी यंदाही वारकऱ्यांना दूषित पाण्यात स्नान करावे लागेल. नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यास महापालिकेला केव्हा जाग येणार, असा सवाल वारकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील कुदळवाडी, म्हेत्रेवस्ती, जाधववाडी, मोरेवस्ती, घरकूल, चिखली आदी भागांतील सांडपाणी थेट इंद्रायणीत मिसळते. ज्या सोसायट्या आणि कंपन्यांचे सांडपाणी वाहिन्यांद्वारे ‘एसटीपी’मध्ये (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) सोडले जात त्यावरच प्रक्रिया होते. इतर नाल्यांमधून वाहणारे पाणी ‘एसटीपी’च्या खालून नदीपात्रात सोडले जाते. परिणामी, नदीचे पाणी काळे पडले असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, चाकण एमआयडीसी, भोसरी एमआयडी, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणीचे प्रदूषण गंभीर मुद्दा बनला आहे.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी हे राज्यभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असताना नदीपात्राची स्थिती खेदजनक असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यंदाही कार्तिकीला लाखो वारकरी आळंदीत येणार आहेत. दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नदीपात्रातील दूषित पाण्यावर वेळीच प्रक्रिया केल्यास वारकऱ्यांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल. त्यासाठी महापालिका, आळंदी नगर परिषद प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन नदीप्रदूषण निर्मूलनाचा निर्णय घेणे वारकऱ्यांना अपेक्षित आहे.
-----------

प्रशासनाकडून अपेक्षा
- ‘एसटीपी’ प्रकल्पांची क्षमता वाढवावी
- सर्व नाले ‘एसटीपी’ला जोडावेत
- उघड्या नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच ते पात्रात सोडावे
- नागरिक, व पर्यावरणप्रेमींच्या मागण्या विचारात घेऊन कार्यवाही करावी
----------

इंद्रायणीच्या पात्रातील जलपर्णी काढल्याचे समाधान आहे. मात्र, नदीच्या उगमस्थानापासूनच नाल्यांतून सांडपाणी सोडले जाते. ते शुद्ध करूनच सोडण्यात यावे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत येतात. त्यांना तीर्थ म्हणून दूषित पाणीच घ्यावे लागते आणि त्यातच स्नान करावे लागते, ही खंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीप्रमाणेच इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी लक्ष द्यावे.
- पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी अध्यक्ष, देहू संस्थान

---------

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे इंद्रायणीचे पात्र दूषित झाले. प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली आतापर्यंत आठ ते १० कोटी रुपये खर्च झाले. १२०० कोटींचा आराखडा तयार झाला, पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. कंपन्या आणि नाल्यांमधून पात्रात सांडपाणी सोडले जाते. अशा कंपन्यांवर कठोर कारवाई झाली तरच हा प्रकार थांबेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेकदा आळंदी-देहूला आले, पण इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. तीर्थही स्वच्छ मिळत नसल्याने वारकऱ्यांचा हिरमोड होतो.
- जयंत ऊर्फ आप्पा बागल, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
------

आळंदीमुळेच इंद्रायणीला तीर्थत्व प्राप्त झाले आहे. येथे जगभरातून भाविक येतात. त्रिभुवनातूनही देवता येतात अशी श्रद्धा आहे. आज या पवित्र स्थळावर प्रदूषणाने परिसीमा ओलांडली आहे. इंद्रायणीचे गटार झाले आहे. राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका आणि
पीएमआरडीए यांनी एकत्र येऊन इंद्रायणीचे प्रदूषण तातडीने रोखले
पाहिजे. सरकारने दुर्लक्ष केले तर वारकऱ्यांना आंदोलन करावे लागेल.
- नरहरी महाराज चौधरी, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
--------

इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण ते राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारच्या पाठबळाशिवाय ते शक्य नाही. वारकरी समाजाने पुढाकार घेऊन अनेक वेळा नदी स्वच्छतेचे प्रयत्न केले, मात्र आर्थिक मर्यादांमुळे सातत्य राखता आले नाही. त्यामुळे सरकारनेच ठोस योजना राबवावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आळंदीत येऊन आश्वासने देतात, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. सरकार आश्वासन देऊन दुर्लक्ष करते, हे दुर्दैवी आहे.
- शरद महाराज गायकवाड, ज्येष्ठ वारकरी, दौलत बुआ आंधळे दिंडी, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी रथापुढे (दिंडी क्रमांक ५) उंबरे, (वेळापूर) ता. माळशिरस
-------

लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि देहू अशा सुमारे ४८ किलोमीटर अंतरावरून इंद्रायणी नदी वाहत येते. एका बाजूला पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र, तर दुसऱ्या बाजूला पीएमआरडीए, चाकण एमआयडीसी आणि आळंदी नगरपरिषद आहे. नदीच्या उगमस्थानापासून अनेक नाले इंद्रायणीला जोडले गेले आहेत. या नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठवला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम सुरवात होईल. कुदळवाडी येथील एसटीपीची क्षमता तीन एमएलडी आहे. या प्रकल्पाद्वारे नाल्यातील तेवढेच पाणी उचलून प्रक्रिया करून ते पात्रात सोडले जाते. सध्या त्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com