दिवसभर कष्टाचे काम, तरीही अपुरा दाम

दिवसभर कष्टाचे काम, तरीही अपुरा दाम

Published on

पिंपरी, ता. ९ : शहरात आजच्या स्थितीत सुमारे ९५ हजार घरेलू कामगार आहेत. दररोज आठ-दहा तास इतरांचे घरकाम करूनही स्थिर उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्या व्यक्त करतात. ‘‘किमान वेतन समान काम या तत्वानुसार आमच्या कामाचे तास आणि मोबदला विचारात घेतला, तर समाधानाने काम करता येईल. दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने आमचे जगणे कठीण होत आहे,’’ अशी व्यथा या कष्टकरी महिलांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सुमारे ५०० हून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. तेथे स्वयंपाक, भांडी-कपडे धुणे, झाडलोट, बालसंगोपन अशा कामांसाठी या महिलांचा मोठा वर्ग कार्यरत आहे. त्यांना दररोज ८ ते १० तास काम करावे लागते. मात्र, बहुतांश ठिकाणी किमान वेतन मिळत नाही. काही ठिकाणी घरमालकांकडून मनमानीपणे वेतनात कपात केली जाते. तर, सुट्ट्यांबाबत कोणतीही हमी दिली जात नाही. त्यामुळे पिळवणूक होत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. तत्कालीन राज्य सरकारने २०१३ मध्ये घरेलू कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले होते. पण, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. २०१४ नंतर सरकारने घरेलू कामगार कल्याण मंडळाला निधी दिला नाही. कामाचे तास आणि किमान वेतन किती मिळावे याबाबत ठराव नाही. त्यामुळे हजारो घरेलू कामगारांना तुटपुंज्या वेतनावर कष्ट करावे लागत आहेत. रोजगार करार नसल्याने किंवा नोंदणीची प्रक्रिया अपूर्ण असल्याने कामगारांना कायदेशीर संरक्षण नाही. घरेलू कामगार संघटनांनी शासनाकडे नियमित नोंदणी, वेतनश्रेणी आणि विमा योजना तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.

सरकारने किमान वेतन वाढवावे
सरकारने घरगुती कामगारांसाठी आठ तासांच्या कामाचे दर प्रतिमहा ६,५०० ते १०,००० रुपये इतके ठरवले आहेत. मात्र, महागाईच्या पार्श्वभूमीवर हे वेतन अत्यंत अपुरे असल्याची भावना कामगारांमध्ये आहे. इतर नोकरीचे पर्याय मर्यादित असल्याने घरकामगारांना मिळेल ते काम स्वीकारावे लागते. कामाची वेळ निश्चित नसल्यामुळे कमी वेतनावर काम करावे लागते. सरकारने किमान वेतनात वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- पिंपरी चिंचवडमधील घरेलू कामगारांचा आढावा
शहराची लोकसंख्या : ३० लाख
घरेलू कामगार संख्या : ९५,०००
२०१३ मध्ये सरकारने ठरविलेले दररोजचे कामाचे तास : ८ तास
२०१३ मध्ये सरकारने ठरविलेले प्रतिमहा किमान वेतन दर : ६,५०० ते १०,००० रुपये
सध्या घरेलू कामगारांना दरमहा मिळणारा मोबदला : ४,००० ते ५,०००

- कामाची व्याप्ती अधिक दर मात्र एकच (प्रतिमाह)
१ बीएचके सदनिका स्वच्छ करण्यासाठी : ६०० ते ८०० रुपये
३, ४ बीएचके सदनिका स्वच्छ करण्यासाठी : ६०० ते ८०० रुपये
चार व्यक्तींचा स्वयंपाक करण्यासाठी : ३ हजार ते ४ हजार
पाच ते सहा व्यक्तींचा स्वयंपाक करण्यासाठी : ४ ते ५ हजार रुपये
कपडे, भांडे धुण्यासाठी : ४०० ते ५०० रुपये

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील घरेलू कामगारांची नोंदणी केलेली आहे. नोंदणीकृत महिला कामगारांना सन्मानधन निधी वाटप करतो. परंतु, किमान वेतन आणि कामाचे तास किती असावेत याबाबत सरकार पातळीवरून आम्हाला कळवण्यात आलेले नाही. सध्या त्या-त्या भागांतील विकासानुसार तेथील घरकाम करणाऱ्या कामगारांना वेतन ठरवण्याचे अधिकार आहेत.
- शीतल कुलकर्णी, सहायक आयुक्त, घरेलू कामगार विभाग, पुणे

घरेलू कामगारांची स्थापना झाल्यापासून एकाच पाच कोटींचा निधी मिळाला. त्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले. महामंडळाचे काम थांबल्यामुळे घरेलू कामगारांना किमान वेतन, कामाचे तास निश्चित करुन दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला दिवसभरात अनेक कुटुंबीयांची कामे करून करावी लागते. प्रशासकीय उदासीनता आणि घरेलू कामगारांमधील सुशिक्षितपणाचा अभाव यामुळे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नसल्याची खंत आहे.
- आशा कांबळे, अध्यक्षा, घरकाम महिला सभा

चार माणसांचा स्वयंपाक करायचे सांगतात आणि सहा ते सात माणसांचा स्वयंपाक करवून घेतात. एक व्यक्ती तीन पोळ्या (चपाती) खात असेल तर तो पाच पोळ्या खातो, असे सांगून आमच्याकडून काम करवून घेतले जाते. आम्ही उलट बोलण्याचा प्रयत्न केला, तर कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवतात. त्यामुळे पोटासाठी आम्हाला तीन ते चार हजार रुपये प्रतिमहा एवढ्या पगारावर काम करावे लागत आहे.
- शोभा शिंदे, घरेलू कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com