गुन्हे वृत्त
डिजिटल अरेस्टच्या भीतीने
ज्येष्ठाला २२ लाखांचा गंडा
पिंपरी : व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट आणि मनी लाँडरींगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून एका ज्येष्ठ नागरिकाला एकूण २२ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जुनी सांगवीतील ७१ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादीच्या व्हॉट्स ॲप नंबरवर व्हिडिओ कॉल केले. तुमच्या नावावरील मोबाईल क्रमांक चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये वापरण्यात आला आहे. सायबर गुन्हे विभागाने तुमच्यावर मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल केला असून तुमच्या नावावरील कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या घरातून जप्त करण्यात आले आहे. मनी लाँडरींगसाठी खाते वापरण्यास देऊन २५ लाख रुपये कमिशन घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवरून सीबीआय आणि न्यायालयासमोर तुम्हाला ऑनलाइन हजर केले असून २३ ते ३० सप्टेंबरपर्यंत दरम्यान डिजिटल अरेस्ट करण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात आले. तसे बनावट आदेश त्यांना व्हॉट्स ॲपवर पाठविण्यात आले. गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली फिर्यादीला बँक खात्यात १५ लाख ५० हजार आणि सात लाख रुपये अशी रक्कम जमा करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर आरोपींनी व्हिडिओ कॉल करणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठाने फिर्याद दिली.
---------------------------------
काळेवाडीत अल्पवयीन मुलावर हल्ला
पिंपरी : काळेवाडीतील श्रीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून सतरा वर्षीय मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी थेरगावमधील मुलाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विशाल भीमराव कांबळे (रा. श्रीनगर, काळेवाडी) याला अटक केली. याशिवाय हर्षद आणि इतर दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी मित्राबरोबर जात असताना आरोपी अचानक आडवे आले. विशालने फिर्यादीच्या मित्राला धमकी देत नवरात्रीच्या वेळी झालेल्या भांडणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने कोयत्याने, तर इतर आरोपींनी सिमेंटचे गट्टू घेऊन फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादीच्या मित्रालाही मारहाण झाली. फिर्यादीच्या मदतीला परिसरातील लोक येऊ लागताच विशालने हातातील कोयता हवेत भिरकावून दहशत निर्माण केली.
---------------------------
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची ५० लाख दोन हजार ५२९ रुपयांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सतीष रवींद्र हैदुरशेट्टी (रा. डुडुळगाव फाटा, डुडुळगाव) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आयेश सुलताना आणि अतुल भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला. आयेशने फिर्यादीला व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन करून लिंकद्वारे त्यांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीला शेअर्स आणि आयपीओच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडले गेले. रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या करांच्या नावाखाली आणखी रक्कम भरण्यास सांगितले गेले.
-------

