औद्योगिक कामगारांची जगण्याची लढाई कायम

औद्योगिक कामगारांची जगण्याची लढाई कायम

Published on

पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड ही औद्योगिकनगरी झपाट्याने विकसित होत आहे. परंतु, वाढते घरभाडे आणि महागाईमुळे उद्योग क्षेत्रात कार्यरत कामगारांचे राहणीमान अधिकच कठीण झाले आहे. कामगारांच्या पगारात अपेक्षित वाढ होत नसताना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कामगारांना कौटुंबिक खर्च भागवताना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत.
शहरातील पिंपरी, भोसरी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात लाखो कामगार कार्यरत आहेत. यापैकी मोठ्या संख्येने कामगार हे ग्रामीण भागांतून येऊन शहरात भाड्याने राहतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत घरभाड्यात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. घरभाडे, वाढलेले किराणा दर, वीजबिल आणि वाहतूक खर्च यामुळे हातात काहीच रक्कम उरत नाही, अशी व्यथा कामगारांनी व्यक्त केली आहे. दहा ते पंधरा हजार रुपये मासिक वेतनात कौटुंबिक खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि गावी असलेल्या वृद्ध आई-वडिलांचा खर्च भागवणे अशक्य झाले आहे, अशी खंत एका कंपनीत कार्यरत कामगाराने व्यक्त केली.

परप्रांतीय कामगारांनाही फटका
उद्योग क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्रात मिळेल ते काम करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून लाखो कामगार पिंपरी चिंचवड परिसरात येतात. हे कामगार जुन्या चाळी, लेबर कॅम्प, कॉलनी किंवा कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साध्या निवासस्थानी राहतात. काही कामगार कुटुंबासह राहतात, तर काही अविवाहित कामगार एकाच खोलीत अधिक संख्येने एकत्र राहतात. तर काहींनी आपले कुटुंब गावाकडे ठेवून स्वतः मात्र रोजगारासाठी शहरात वास्तव्य केले आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत आणि वार्षिक पगारवाढही होत नाही. त्यामुळे वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका या स्थलांतरित कामगारांना बसत आहे.


शासनाचे किमान वेतन दर (सर्व रुपयांत)
- अकुशल कामगार : १२,००० ते १४,००० प्रतिमहिना
- अर्धकुशल : १५,००० ते १७,०००
- कुशल : १८,००० ते २०,०००
- अत्यंत कुशल : २१,००० पेक्षा अधिक

वेतन दरवाढ अपुरी
- शासनाकडून औद्योगिक कामगारांच्या वर्गवारीनुसार किमान वेतन निश्चित
- वाढत्या महागाईचा विचार करून हे दर वाढविण्यात आले
- वेतन संरचना लागू न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची तरतूद
- मात्र ही वाढ अपुरी असल्याचे कामगारांचे म्हणणे
- शासकीय दरानुसार वेतन मिळत नसल्याची कामगारांची खंत


घरमालक दरवर्षी भाडे वाढवतो. पण, आमच्या पगारात काहीच वाढ होत नाही. महिन्याच्या शेवटी काहीही हातात राहत नाही. गावाकडच्या कुटुंबाला पैसे पाठवणेही शक्य होत नाही.
- राजेश यादव, वेल्डर

आठ ते नऊ तास काम करावे लागते. इतके कष्ट करूनही महिन्याला फक्त नऊ हजार रुपये पगार मिळतो. एवढ्या कमी उत्पन्नात घरखर्च भागवणे अशक्य झाले आहे. पगारवाढ मागितल्यावर उलट कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते.
- मनीषा बनसोडे, सफाई कामगार

कंपनी पगारवाढ देत नाही. पण, घरमालक मात्र दरवर्षी भाडे वाढवतात. त्यातच महागाई वाढल्यामुळे खर्च भागवणे कठीण झाले आहे. एवढ्या कमी पगारात मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च आणि दवाखान्याचे बिल भागवता येत नाही. आता गावाकडे परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
- तुकाराम गायकवाड, मजूर

मी गेली पाच वर्षे एका कारखान्यात काम करतो. पगारात काहीही वाढ होत नाही, पण घरभाडे आणि बाजारभाव दरवर्षी वाढत आहेत. महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. कुटुंब गावी आहे आणि इथे
राहण्यासाठीच सगळे पैसे खर्च होतात.
- बबलू कुमार, हेल्पर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com