नाट्यगृहांच्या ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत त्रुटी

नाट्यगृहांच्या ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत त्रुटी

Published on

पिंपरी, ता. ११ ः शहरातील नाट्यगृहांच्या बुकिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन प्रणाली सुरु केली. गेल्या काही महिन्यांपासून मात्र अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने तारखाच मिळत नसल्याने प्रयोगांची संख्या घटली आहे. ऑनलाइन प्रणाली बंद करून पूर्वीप्रमाणेच बुकिंग घेतले जावे अशी मागणी होत आहे.
शहरात महापालिकेची प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर अशी नाट्यगृहे आहेत. यापैकी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सर्वाधिक प्रयोग होतात. त्यापाठोपाठ निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बुकिंग होते. यापूर्वी नाट्यप्रयोगांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग नाट्यगृहात जाऊन केले जात होते.
---
काय आहेत समस्या
- एकाच नाट्यगृहात एका वेळी अनेकांचे बुकिंग होते
- अनेकांकडून रक्कम घेतली जाणे
- ऑनलाइन बुकिंग करूनही स्लॉट मिळण्याची शाश्‍वती नाही
- रिफंड मिळण्यातही विलंब

ऑनलाइन बुकिंग का हवे
- बुकिंग करणे सोपे होण्यासाठी
- भाडे, अनामत रकमेबाबत पारदर्शकता आणण्यासाठी
- घरबसल्या बुकिंग करता येण्यासाठी
---
ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे एकाच दिवशी, एकाच वेळेला दोन-तीन कार्यक्रमांचे बुकिंग घेतले जात आहे. भरलेली रक्कम सिस्टीमवर दिसत नसल्याने प्रत्यक्ष नाट्यगृहातील कार्यालयात जाऊन त्याची खातरजमा करावी लागत आहे. या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे.
- राजू बंग, नाट्य व्यवस्थापक
---
बुकिंगसाठी संगणक प्रणाली सुरू होण्यापूर्वी तारखांचे वाटप केले जात होते. त्यामुळे नाटकाला तारखा मिळत होत्या. ऑनलाइन प्रणालीमुळे एवढ्या अडचणी येत आहेत की नाटकांना तारखा मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करणे अवघड होत चालले आहे.
- समीर हंपी, नाट्य वितरक
---
ऑनलाइन प्रणालीमुळे नाट्यगृहाच्या बुकिंगमध्ये पारदर्शकता येणार आहे. शहरातील नागरिक व नाट्यनिर्मात्यांची यामुळे सोयच होणार आहे. या प्रणालीतील काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी आयटी शाखा काम करीत आहे. ज्यांची अनामत रक्कम राहिली आहे, त्यांना परतावा दिला जाईल. त्रुटींवर ठोस उपाययोजना करून ही कार्यपद्धती चांगल्या प्रकारे सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल.
- पंकज पाटील, उपायुक्त, कला-क्रीडा विभाग, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com