औद्योगिक बांधकाम मंजुरी प्रक्रियेत अडथळे

औद्योगिक बांधकाम मंजुरी प्रक्रियेत अडथळे

Published on

पिंपरी, ता. ११ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत औद्योगिक परिसरांतील बांधकामांना मंजुरी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. आवश्यक कागदपत्रांविषयी माहितीच्या अभावी अनेक वास्तूरचनाकारांना सर्व कागदपत्रे सादर करता येत नाहीत. परिणामी विकास परवानगी व नियोजन विभागाकडील प्रलंबित अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या ‘पीएमआरडीए’च्या ऑनलाइन प्रणालीवर औद्योगिक बांधकामांचे ३०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी केवळ शंभर अर्जांनाच मंजुरी देण्यात आली. उर्वरित २०० अर्ज मंजुरीअभावी प्रलंबित आहेत. यात तांत्रिक त्रुटी, नकाशांमधील विसंगती आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
औद्योगिक बांधकामांना मंजुरी मिळविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कागदपत्रे आवश्यक आहेत. यातील दोन-तीन महत्त्वाची कागदपत्रे अनेकदा अपूर्ण राहतात, असे या विभागाचे म्हणणे आहे. अनेक वास्तुरचनाकार आणि विकसक ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक तपशील योग्य प्रकारे भरत नाहीत. परिणामी अर्ज परत येतो. ‘पीएमआरडीए’ने यापूर्वी अशा अनेक तक्रारी नोंदविल्या असून तांत्रिक यंत्रणा भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आवश्‍यक कागदपत्रे -
- औद्योगिक बांधकामासाठी आवश्यक कागदपत्रे
- मालकी हक्कासंबंधी कागदपत्रे
- झोनिंग आणि परवानगी
- नकाशा आणि आराखडे
- पर्यावरण आणि सुरक्षितता परवानग्या
- बांधकाम परवानगी अर्ज (अर्ज क्रमांक १)
- मालक व वास्तुरचनाकार यांच्या स्वाक्षऱ्या असलेले अर्ज आणि प्रतिज्ञापत्र
- कचरा व्यवस्थापन योजनेचा आराखडा
- बांधकाम परवानगी शुल्क व विकास शुल्काची पावती
---

औद्योगिक परिसरातील बांधकामांना मंजुरी घेताना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. त्‍यामध्ये अनेक त्रुटी असतात. त्‍यामुळे त्‍या अर्जांना मंजुरी मिळत नाही. वास्तूरचनाकाराने अपूर्ण कागदपत्रे जमा केल्‍याने अर्ज प्रलंबित राहत आहेत. यात प्रशासकीय दिरंगाई नाही. त्‍यासाठी त्‍यांची कार्यशाळा घेण्यात येत आहे.
- अविनाश पाटील, संचालक, विकास परवानगी व नियोजन विभाग
-----

Marathi News Esakal
www.esakal.com