वर्धापन दिन - एज्युकेशन लेख - पुरवणी
एज्युकेशन पुरवणी
---
आधुनिक शिक्षणाची
नवी दिशा
आजचे शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे साधन राहिलेले नाही, तर ते जीवनकौशल्य विकसित करणारे, मूल्यसंवर्धन घडवणारे आणि भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे माध्यम बनले आहे. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत आहे.
- अभय खंडागळे, प्राचार्य, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी
आ जचा विद्यार्थी ‘का शिकावे’, ‘काय शिकावे’ आणि ‘कसे शिकावे’ याबद्दल जागरूक आहे. तो केवळ गुणांसाठी नव्हे, तर स्वतःची आवड-क्षमता ओळखून शिक्षणाकडे पाहतो. त्यामुळे पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी विद्यार्थीकेंद्रित आणि अनुभवाधारित शिक्षणपद्धती स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. संवादकौशल्य, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि संशोधनाची दृष्टी या गोष्टी आता शिक्षणाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. वर्गातील शिक्षणाबरोबर प्रकल्प, इंटर्नशिप, उद्योगभेटी, स्टार्टअप उपक्रम आणि समुदाय सहभाग यावर भर देणे ही काळाची गरज बनली आहे. आधुनिक शिक्षणाने केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा टीकात्मक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान वापरण्याची तयारी यावर अधिक भर द्यावा लागेल.
परिवर्तनाची नवी दिशा
भारत सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे परिवर्तनाचा पाया ठरले आहे. या धोरणानुसार शिक्षण अधिक लवचिक, कौशल्याधारित आणि बहुविषयक बनविण्यावर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थी एका टप्प्यावर शिक्षण थांबवून नंतर पुन्हा सुरू करू शकतो. कौशल्यावर आधारित शिक्षण महत्त्वाचे ठरत आहे. विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान शाखांव्यतिरिक्त विषय घेऊ शकतात. ऑनलाइन शिक्षण, संकरित वर्ग, स्वयंअध्ययन या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही झाले आहे. या सुधारणा शिक्षणाला जागतिक दृष्टी आणि व्यावहारिकता देतात. ‘जे हवे तेच शिकावे’ ही लवचिक संकल्पना आता वास्तवात उतरते आहे.
नव्या साधनांची क्रांती
स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म्स, गुगल क्लासरूम, झूम, मायक्रोसॉफ्ट, चात जीपीटी, कॅन्हा, कोडिंग यांसारख्या साधनांनी शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे आणि ठिकाणाचे बंधन न ठेवता शिक्षण घेता येते. शिक्षकांनाही विविध डिजिटल साधनांमुळे अध्यापन अधिक सर्जनशील करता येते. परिणामी विद्यार्थी केवळ ज्ञान ग्रहण करणारे नव्हे, तर ज्ञाननिर्माते बनू लागले आहेत.
शिक्षणाचा नवा अध्याय
शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे सर्वात प्रभावी साधन आहे. काळाच्या गरजेनुसार शिक्षणात बदल करणे म्हणजेच भविष्य घडविणे. गुणवत्ता, नवोन्मेष आणि विद्यार्थीहित या त्रिसूत्रीवर आधारित कार्य करून शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या करत आहेत. आज गरज आहे ती अशा शिक्षणाची जे ज्ञानासोबत मूल्य देते, कौशल्यासोबत आत्मविश्वास देते आणि व्यक्तिमत्त्वासोबत जबाबदारीची जाणीव घडवते. याच दिशेने चालणारे प्रत्येक प्रयत्न हेच आधुनिक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी ठरतील.
शिक्षणात नवा विचार
वर्गातील शिक्षणाबरोबर प्रकल्प ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सोडविण्याचे कौशल्य विकसित होते, इंटर्नशिप ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्कप्लेस अनुभव मिळतो, उद्योगभेटीमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधील कामकाज समजू शकते, स्टार्टअप उपक्रमाद्वारे नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देता येते आणि समुदाय सहभागावर भर देणे ही काळाची गरज बनली आहे. आधुनिक शिक्षण काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. कारण आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच चिकित्सक विचार, समस्या सोडवणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर
यासारख्या कौशल्यावर भर देणे गरजेचे आहे. शिक्षण प्रणालीला लवचिक आणि वैयक्तिकृत बनवणे, तसेच व्यावहारिक ज्ञान आणि आजीवन शिक्षणाला महत्त्व देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी बदलत्या जगाशी जुळवून घेऊ शकतील.
काळानुरूप शिक्षणातील बदल
- कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे ः केवळ तथ्ये लक्षात ठेवण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेने चिकित्सक विचारसरणी, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- तंत्रज्ञानाचा वापर ः पारंपरिक चॉक अँड टॉकसोबतच स्मार्टबोर्ड, संगणक आणि टॅब्लेट यांचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर करण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे.
- व्यावहारिक ज्ञानावर भर ः सैद्धांतिक ज्ञानासोबतच त्याचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करायचा यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
- आजीवन शिक्षण ः सामाजिक बदल आणि तांत्रिक प्रगती लक्षात घेऊन सतत नवीन ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, यालाच आजीवन शिक्षण म्हणतात.
- वैयक्तिकृत शिक्षण ः प्रत्येकाच्या गरजा आणि करिअरची उद्दिष्ट्ये वेगळी असल्याने, ‘एक-आकार-सर्वांसाठी-योग्य’ ही पद्धत आता पुरेशी नाही, त्यामुळे वैयक्तिकृत शिक्षणाची गरज आहे.
- नवीन शैक्षणिक धोरणे ः राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० सारख्या धोरणांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण, बालशिक्षणावर भर आणि डिजिटल शिक्षणासारख्या सुधारणांचा समावेश आहे, ज्यामुळे शिक्षण अधिक सर्वांगीण आणि आधुनिक होत असतानाच मूल्य शिक्षणाला योग्य महत्त्व दिले आहे.
--------------
(शब्दांकन ः आशा साळवी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

