प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध
पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या शुक्रवारी (ता. १४) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर नागरिकांना २२ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत, अशी माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.
नियोजित निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित केली जाणार आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, तसेच मुख्यालय स्तरावर पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहातील कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत, असे आदेश जांभळे पाटील यांनी सांगितले. १४ ते २१ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवसांसह सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा आणि २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

