पिंपरी वर्धापनदिन चौगुले शिक्षण महापालिका शाळा

पिंपरी वर्धापनदिन चौगुले शिक्षण महापालिका शाळा
Published on

एज्युकेशन पुरवणी
--
महापालिका शाळांचे
बदलते रूप

प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. प्राथमिक शिक्षण व्यवस्थित मिळाले तर तो विद्यार्थी पुढील शिक्षण सहजपणे अवगत करू शकतो, नाहीतर मग गळती होते. आजही शिक्षणाच्या प्रवाहात येणारी सर्व मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार असले पाहिजे. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्यार्थी विकास, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन हाच विषय डोळ्यासमोर विविध उपक्रम राबवून गेल्या तीन वर्षांत महापालिका शाळांचा कायापालट झाला आहे.
- श्रीकांत चौगुले, पर्यवेक्षक व कला नोडल अधिकारी, शिक्षण विभाग

प्रा थमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे सहा ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत आली पाहिजेत. ती टिकली पाहिजेत. त्यांना अपेक्षित अध्ययन अनुभव मिळाले पाहिजेत. याची निश्चिती करण्यात आली आहे. शिक्षण ही बाब सर्वच टप्प्यावर महत्त्वाची मानली गेली आहे, म्हणून त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था काम करत असतात. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाची प्रत्यक्षातील व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था पाहत असतात. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाचा विचार करता त्याची सुरुवात नगरपालिकेच्या स्थापनेनंतर झाली.

शिक्षण विभागाच्या कार्याला गती
तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या काळात शिक्षण विभागाच्या कार्याला विशेष गती मिळाली. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. शिक्षणाच्या बाबतीत अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आवश्यकतेनुसार सोयीसुविधा दिल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे गेल्या तीन वर्षांत शाळांचे स्वरूपच बदलून गेले आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे काही वर्षे शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि ते अधिकारी झाले. त्यामुळे शिक्षणातील अडथळे आणि समस्या यांची त्यांना उत्तम जाण आहे. माजी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात व सध्याचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नामुळे शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. बदल करण्यात आले. त्या सर्वांचा थोडक्यात आढावा.

भौतिक सुविधा व नामकरण
पिंपरी चिंचवड महापालिका शाळांच्या इमारती सुरुवातीपासून सुस्थितीत आहेत. त्याची आवश्यकतेनुसार दुरुस्ती, रंगरंगोटी सुशोभीकरण करण्यात आले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकजिनसीपणा येण्यासाठी व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आकर्षक नाव लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल’ या नावाचा स्वीकार केला गेला. त्यासाठीचे बोधचिन्ह आणि आकर्षक असे नामफलक सर्व शाळा इमारतीवर लावण्यात आले. त्यापूर्वी शाळा स्थानिक नाव व शाळा क्रमांकावरून ओळखल्या जायच्या. आता आकर्षक नाव मिळाल्याने टिपिकल महापालिकेची शाळा न वाटता त्यामध्ये आकर्षकता आली आहे.

मनुष्यबळाची उपलब्धता
कोरोना काळानंतर महापालिकेच्या शाळांचा पट वाढला. पण त्यासाठी तत्काळ शिक्षक मिळणे शक्य नव्हते. मागील संच मान्यतेनुसार शिक्षक कार्यरत होते. त्यात पवित्र पोर्टल भरतीसाठीचा विलंब, या सर्वांमुळे शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी होती. काहींना दोन-तीन वर्ग सांभाळावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात आल्यावर आयुक्तांनी प्राथमिक शाळांसाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन शिक्षक भरती करण्याचे ठरविले आणि त्यानुसार कृती केली. साधारण २१० मानधन शिक्षकांची भरती केली. प्रत्येक वर्गासाठी शिक्षक उपलब्ध झाल्याने काम करणे सुलभ झाले. त्याचा परिणाम शाळांच्या गुणवत्ता वाढीवर झाला.

कला क्रीडा शिक्षक
महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये एका वर्गासाठी एक शिक्षक असतो. त्याच्या दृष्टीने अन्य विषय महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्याकडेच अधिक लक्ष दिले जाते. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याकडे दुर्लक्ष होते. या विषयासाठी त्या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केली तर चांगला परिणाम होईल. हे लक्षात घेऊन दर दोन शाळांमध्ये एक कलाशिक्षक असे पहिल्या वर्षी १७ शिक्षक व आता सर्व शाळांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे. कला शिक्षकांमुळे चित्रकला व अन्य कलांना प्रोत्साहन मिळाले. मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. शाळांमधील अनेक मुलांना शासनाच्या चित्रकला विषयक परीक्षांना बसविले. त्यामध्ये उत्तम यश प्राप्त झाले. क्रीडा शिक्षकांमुळे शाळेत कवायत, साधन कवायत, विविध खेळांचे संघ, त्यांचा सराव या बाबी सहजतेने घडल्या. शाळेची शिस्त आणि मुलांना खेळायला मिळू लागले. त्यामुळे शाळांमधील उपस्थिती वाढली.

शाळांना विशेष निधी
शाळांच्या पटसंख्येनुसार प्रत्येक शाळेला अनुक्रमे साठ हजार, ऐंशी हजार, एक लाख रुपये असे अनुदान देण्यात आले. त्यामुळे मुख्याध्यापकांना शाळा सुशोभन, शिष्यवृत्ती परीक्षा विशेष मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचा दैनंदिन खर्च यासाठी निधी उपलब्ध झाला. अनेक शाळांनी त्याचा सदुपयोग करून शाळांच्या बदलासाठी, मुलांसाठी सुंदर उपयोग केला. मुलांच्या विविध स्पर्धा व विजेत्यांना बक्षीसे यातून मिळू लागली, त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळाले. मुख्याध्यापक कार्यालयापासून, शाळा इमारतीपर्यंत सुशोभीकरण करण्यासाठी या निधीचा वापर झाला. काही शाळांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले. विद्यार्थी विकास, कौशल्य विकास यासाठी प्रयत्न केले. त्याचा शाळांच्या गुणवत्ता वाढीवर सकारात्मक परिणाम झाला.

क्यूसीआय मूल्यमापन
सुरुवातीला शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी, सर्व शाळांचे त्रयस्थ एजन्सीमार्फत मूल्यमापन करण्यात आले. भारत सरकारच्या अंतर्गत असणारी आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या क्युसीआय (क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया) या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व वर्षाअखेर अशा दोन परीक्षा घेऊन महापालिकेच्या शाळेतील सर्व मुलांचे मूल्यमापन केले. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून शिक्षकांचे विषयानुसार पाठ निरीक्षण केले. त्याबाबतचा अहवाल दिला. त्यानुसार कार्यप्रणालीत आवश्यकते बदल करण्यात आले.

सक्षम उपक्रम
लेखन, वाचन, अंकज्ञान या पायाभूत साक्षरतेसाठी केंद्र व राज्य यांचे निपुण भारत, निपुण महाराष्ट्र हे उपक्रम चालू आहेत. पण त्याचबरोबरीने क्यूसीआयच्या रिपोर्टनुसार अक्षम असणाऱ्या मुलांना सक्षम करण्यासाठी, सक्षम या नावानेच उपक्रम आयोजित केला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले व ४५ दिवसांचा काल मर्यादित कार्यक्रम आखण्यात आला. त्याचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला. त्यासाठी स्तरानुसार पुस्तिका तयार करण्यात आल्या. गेल्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे लिहिता वाचता न येणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्या क्षमताप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न झाले. त्याचा गुणवत्ता वाढीवर विशेष प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची व्यवस्था या उपक्रमाने केली. त्याचबरोबर शिक्षकांना प्रशिक्षण तसेच त्यांच्या कार्याचे मूल्यमापन यासाठी मेंटोर शिक्षक निवडले गेले. पाच शाळांमध्ये एक मेंटोर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन व शिक्षकांच्या कार्याचे निरीक्षण करण्यात आले. अभ्यासात मागे असणाऱ्या अथवा शालाबाह्य मुलांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरला. त्याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर झाला.

अवांतर वाचनासाठी...
वाचता येणाऱ्या मुलांना अथवा नव्याने वाचायला शिकलेल्या मुलांना, वाचनाची गोडी लागावी. त्यांनी अधिक सराव करावा. यासाठी प्रत्येक वर्गासाठी वर्ग ग्रंथालय ही संकल्पना राबविली. शाळेचे ग्रंथालय असते. साधारण ते मुख्याध्यापक कार्यालयात असते. त्याचा तितका प्रभावी वापर होत नाही. यासाठी वर्ग ग्रंथालय सुरू करण्यात आले. त्याद्वारे प्रत्येक वर्गासाठी एक कपाट व साधारण तीनशे पुस्तके देण्यात आली. यामध्ये पुस्तके अधिक आकर्षक, चार रंगातील तसेच मजकूर कमी व चित्रे अधिक, मुलांच्या आवडीच्या विविध विषयांचा त्यामध्ये समावेश. अशा पुस्तकांची निवड करण्यात आली. पुस्तकाच्या देवाण-घेवाणीसाठी वर्गातील एका विद्यार्थ्यांची निवडून त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षकांनी वर्ग वाचनालय चार उत्तम उपयोग करून वाचन उपक्रमाला अधिक बळकटी दिली.

मुख्याध्यापक क्लस्टर मीटिंग
महापालिकेचे आठ प्रभाग आहेत. प्रभागनिहाय दर महिन्याला मुख्याध्यापकांची क्लस्टर मीटिंग घेण्यात येते. ही मीटिंग म्हणजे व्यवस्थापन व शैक्षणिक समस्या निवारणाचे प्रशिक्षणाचे असते. तीन चार तासांमध्ये ठरलेल्या विषयावर मेंटोर मुख्याध्यापक इतरांचे प्रशिक्षण घेतात. शेवटी शैक्षणिक समस्यांवर चर्चा होते. त्याचा उपयोग शालेय व्यवस्थापन उत्तम करण्यासाठी होतो. तसेच मुख्याध्यापकांना अधिक कार्यप्रेरणा मिळावी, यासाठी अनेक नामांकित व प्रयोगशील संस्थांना भेटी देण्यात येतात. त्यातून ज्ञानप्रबोधिनी, जालिंदरनगर अशा अनेक शाळांना भेटी देण्यात आल्या. आयुका व इतर ठिकाणी भेट देऊन त्या संस्थांच्या कार्याविषयी जाणून घेण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण
शैक्षणिक कार्यासाठी शाळेला समाजाची मदत झाली पाहिजे. ग्रामीण भागात ती सहजतेने होते. शहरी भागात ते थोडे कठीण असते, त्यामुळे समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीला अधिक सक्षम करणे गरजेचे ठरते. शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर असून चालत नाही. ती कृतिशील असली पाहिजे. यासाठी समितीच्या निवड प्रक्रियेतच बदल करण्यात आला. पालक सभा घेऊन, त्यात निवडणूक पद्धतीने समितीची स्थापना करण्यात आली. समितीची जबाबदारी आणि शाळेचा विकास, याबाबतचे प्रबोधन करणारे संपर्क सत्र आयोजित करण्यात आले. त्यासाठी शहरातील सर्व शाळांतील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती देऊन, शाळा अनुदानाचा विनियोग करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा सकारात्मक उपयोग शैक्षणिक कार्यासाठी मुख्याध्यापकांना करता आला.

शैक्षणिक दिनदर्शिका
शैक्षणिक वर्षातील, शैक्षणिक नियोजन उत्तम प्रकारे व्हावे, कोणत्या दिवशी, कोणते उपक्रम घ्यावेत, यासाठी सर्व शाळांमध्ये सूत्रबद्धता असावी म्हणून शैक्षणिक कॅलेंडरची निर्मिती करण्यात आली. ते सर्व शिक्षकांना वितरित करण्यात आले. शालेय सुट्ट्या, आकारीत मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, विविध दिनविशेष, आनंदही शनिवार व त्यादिवशी घ्यावयाचे उपक्रम. या सर्व बाबींचे नियोजन त्यामध्ये देण्यात आले आहे. शैक्षणिक सहल, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम. या सर्वांचाही निर्देश करण्यात आला आहे. त्याचा उपयोग शाळेच्या दैनंदिन नियोजनासाठी उत्तम प्रकारे होत आहे.

डाटा ऑपरेटर
केंद्र शासनापासून स्थानिक स्तरापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत सातत्याने माहिती मागविली जाते. ती ऑनलाइन द्यावी लागते. अनेक लिंक भराव्या लागतात. यू-डायसचे काम करावे लागते. या सर्वांसाठी मुख्याध्यापकांना संगणकाचे ज्ञान असणाऱ्या शिक्षकावर अवलंबून राहावे लागत असे. अशा शिक्षकांची मदत घेणे, त्यांच्यावर जबाबदारी देणे म्हणजे त्यांचा वेळ जाणे. पर्यायाने वर्गाकडे दुर्लक्ष होणे. अभ्यासक्रम पूर्ण न होणे. अशा अनेक समस्या होत्या. यावर उपाय म्हणून आयुक्तांनी प्रत्येक शाळेला एक डाटा ऑपरेटर देण्याचे ठरविले. शाळेला कार्यालयीन कामाला एक पूर्ण वेळ माणूस मिळाल्याने पत्रव्यवहारापासून अपेक्षित माहिती वेळेत देण्यापर्यंत सर्व कामे सुरळीतपणे पार पडू लागली. साधारण एक वर्षापासून डाटा ऑपरेटर प्रत्येक शाळेत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापन करणे सोयीचे झाले आहे.

जल्लोष शिक्षणाचा
२०२२-२३ व २०२३-२४ या दोन शैक्षणिक वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जल्लोष शिक्षणाचा हा विशेष उपक्रम घेण्यात आला. महापालिका शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा प्रभागस्तरावर घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांची अंतिम स्पर्धा घेण्यात येऊन त्याचा बक्षीस वितरण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी सत्कार व संवाद. कलाप्रदर्शन, शैक्षणिक व्याख्याने आदी सर्वांचा यामध्ये समावेश करण्यात आला. गेल्या वर्षीचा जल्लोष कार्यक्रम बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी, सादरीकरणासाठी चांगले व्यासपीठ मिळाले. त्याचा उत्तम उपयोग झाला.

संपर्क सत्रे व शिक्षकांना प्रोत्साहन
महापालिका शाळेतील सर्व शिक्षकांची व मुख्याध्यापकांशी त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पहिले सत्र शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तर दुसरे सत्र दुसऱ्या सत्रात याप्रमाणे आयोजन केले गेले. या दोन्हीही संपर्कसत्रात आयुक्तांनी स्वतः शिक्षणाचे महत्त्व, शिक्षकांचे कार्य, देशाचा विकास आणि शिक्षण आदी मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या बोलण्यात सहजता होती. त्यांची शिक्षण विषयाची तळमळ त्यातून दिसत होती. बोलताना त्यांना मराठीतील शब्द आठवत नसेल, तिथेच ते इंग्रजी अथवा हिंदीचा आधार घेत. मराठीत उत्तम बोलत. त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला. शिक्षकांना त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळत गेली. त्याचा परिणाम शाळांमधील वातावरण बदलण्यात झाला. आयुक्तांनी अनेक बदल करतानाच शिक्षकदिन पुरस्कारातही बदल केला. यापूर्वी फाइल, शिफारस याद्वारे पुरस्कार मिळवत. त्यांनी गुणवत्तेनुसार, वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या तयारीवर पुरस्कारासाठी निवड केली. त्यासाठी क्यूसीआय या बाह्य संस्थेची मदत घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गातल्या कामामुळेच पुरस्कार मिळू शकतो. ही भावना शिक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यामुळे अनेक जण उत्साहाने अधिक कार्यमग्न झाले.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन
महापालिकेच्या शाळेत शिकणारी मुले ही बहुतांश अल्पउत्पन्न गटातील, झोपडपट्टीतील असतात. अशा मुलांच्या कौटुंबिक, सामाजिक समस्या खूप असतात. त्यांचे सामाजिक पर्यावरण संस्कारक्षम असतेच असे नाही. यामुळे अनेक मुले एकाकी होतात. अबोल बनतात. किंवा काही बंडखोर असतात. काही मुले शाळेच्या शिस्तीच्या चौकटीत राहत नाहीत. अशा मुलांना बोलते करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी, त्यांना योग्य वळण लावण्यासाठी, महापालिका शाळांसाठी समुपदेशकाची निवड करण्यात आली. साधारण चार-पाच शाळांना एक समुपदेशक. याप्रमाणे निवड करण्यात आली. मुलांची मानसिक समस्या व त्यावरचे उपाय शोधले गेले. समुपदेशकांच्या कार्याचा शाळेला चांगला उपयोग झाला.

शिष्यवृत्ती परीक्षा व भारत दर्शन
पाचवी व आठवीमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भाग घ्यावा म्हणून प्रोत्साहन देण्यात आले. शाळांमध्ये जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिष्यवृत्ती सराव परीक्षा देणे, विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करणे, या सर्वांसाठी शालेय निधीतून खर्च करण्याची मुभा देण्यात आली. या सर्व प्रयत्नामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येतील. ते विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांची भारत दर्शन ट्रिप आयोजित करण्यात आली. पहिल्या वर्षी उत्तर भारत दौरा करण्यात आला तर दुसऱ्या वर्षी दक्षिण भारतातील प्रसिद्ध स्थळे आणि विशेष म्हणजे इस्रोला भेट देण्यात आली. हा सर्व प्रवास मुलांनी विमानातून केला. त्यांनाही वेगळी संधीच प्राप्त झाली. यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला ही प्रेरणादायक गोष्ट ठरली.

शैक्षणिक दौरे
शिक्षण विभागात कार्यरत असणारी पर्यवेक्षीय यंत्रणा, शाळांचे प्रशासन सांभाळणारे मुख्याध्यापक, प्रशिक्षण देणारे मेंटोर शिक्षक या सर्वांना प्रेरणा मिळावी. यासाठी विविध ठिकाणी अभ्यासदौरे करण्यात आले. त्यामध्ये दिल्लीमधील शाळा पाहणी, भोपाळ, डहाणू तसेच लेह लडाख व अन्य ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन, तेथील कार्याची माहिती घेतली. अभ्यास दौऱ्यात घेतलेल्या अनुभवाचा आपल्या कार्यासाठी काय उपयोग होऊ शकतो, यांचे चिंतन घडले. चिंतनातून समोर आलेल्या बाबी आपल्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला.

एमआयएस पोर्टल
मुख्यालयाकडून शाळांकडे सतत माहिती मागितली जाते. ती बरेच वेळा तातडीची, तत्काळ अशी असते. अशा माहितीमुळे हातातले काम टाकून ते करावे लागते, त्यामुळे वर्गाकडे दुर्लक्ष होते. वेळेचा अपव्यय होतो. या सर्वावर उपाय म्हणून महापालिकेसाठी एमआयएस हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांची माहिती शाळेतूनच ऑनलाइन भरायची असते. ती माहिती संकलित स्वरूपात ऑफिसमध्ये राहणार आहे. आवश्यक तेव्हा त्याचा परत वापर उपयोग करता येणार आहे. त्यामुळे वारंवार माहिती मागविण्याची आवश्यकता भासणार नाही. हे काम डाटा ऑपरेटर करत असल्याने शिक्षकांवर त्याचा भार नाही. या प्रणालीमुळे एका क्लिकवर महापालिकेच्या शिक्षण विभागाची सर्व माहिती मिळू शकते. याचा सर्वांनाच उपयोग होऊ शकतो

विद्यार्थी लाभाच्या योजना
डीबीटीद्वारे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. त्यामध्ये गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास इत्यादी साहित्याचा समावेश होतो. त्यासाठी मुलांना साडेतीन हजार रुपये देण्यात येतात. ते पालकांच्या खात्यावर पाठविले जातात. त्याला डीबीटी असे म्हणतात. गेल्या दोन वर्षात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना डीबीटी अंतर्गत रक्कम देण्यात आली. त्यातून कोणत्या वस्तू खरेदी करायच्या याची यादी दिली जाते. पुरवठादार व्यक्ती शाळेत येते. त्याच्याकडून वस्तू घ्यायच्या असतात. यामुळे मोफत साहित्याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्याचाही उत्तम परिणाम दिसून आला.

गुणवंतांना बक्षीस
पिंपरी चिंचवड महापालिकेची १७ माध्यमिक विद्यालये आहेत. यामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी जादा तासिकेपासून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. दहावीच्या परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याला, पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. दरवर्षी लाखाचे मानकरी अनेकजण ठरत असतात. त्याचा त्यांच्या भविष्यासाठी उपयोग होत असतो.

इंग्रजी भाषा कौशल्य विकास
मराठी भाषा व संख्याज्ञान यासाठी सक्षम उपक्रम सुरू केला पण पहिलीपासून इंग्रजी विषय असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले तर मुले इंग्रजी विषयात मागे राहतील. त्या उलट इंग्रजी विषय पहिली दुसरीच्या वर्गातच चांगला झाला तर मुलांना इंग्रजीची आवड निर्माण होईल व नंतरच्या काळात इंग्रजी विषयाचा अधिक आवडीने अभ्यास करतील. यासाठी सुरुवातीला पहिली दुसरीच्या शिक्षकांना दर महिन्याला इंग्रजीचे ट्रेनिंग देण्यात आले. त्यामध्ये इंग्रजी भाषा कौशल्यांवर भर देण्यात आला. मुलांसाठी इंग्रजी भाषेच्या कौशल्यावर आधारित स्वतंत्र तीन भागातील पुस्तके निर्माण केली. ती पुस्तके भाषा कौशल्यासाठी कशी वापरावीत, हे शिक्षकांना सांगितले. यावर्षी वर्गांची व्याप्ती वाढविली असून, सध्या पहिली ते पाचवीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंग्रजी भाषा विषयक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मूल्यमापन करण्यात आले. तेव्हा १६ टक्के प्रगती झाल्याचे त्यामध्ये दिसून आले. हे कौतुकास्पदच आहे.

मुलांच्या आरोग्याची तपासणी
शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुलांचे आरोग्य तपासणी केली जाते. पण महापालिका स्तरावर महापालिका यंत्रणेमार्फत दरवर्षी मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. ज्या मुलांच्यात दोष आढळतात, त्यांच्यावर महापालिका मध्यवर्ती दवाखान्यात उपचार करण्यात येतात. यामुळे मुलांमधील शारीरिक दोष वेळीच कळतात व त्याच्यावर लगेचच उपचार केले जातात.

चित्र प्रदर्शन आणि सन्मान
महापालिकेच्या चौतीस शाळांमधील मुलांना विषय देऊन चित्रे काढण्यात आली. त्यामधील उत्तम चित्रांची निवड करून त्या सर्वांचे एकत्रित आर्ट बॉक्स या नावाने चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते थेरगाव येथील शिक्षण संकुलात आठ एप्रिल रोजी झाले. त्यामध्ये अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे मुलांच्या या चित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना महापालिका भवनात स्थान दिले आहे. अनेक चित्रांना फ्रेम करून आयुक्त दालनापासून महापालिका इमारतीत जागोजागी मुलांनी रेखाटलेली चित्रे लावली आहेत. मुलांच्या या कलाकृतींना अशाप्रकारे उत्तम स्थान मिळाले. यावर्षी मुंबई येथे झालेल्या मोसो या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत महापालिकेच्या शाळेतील मुलांनी भाग घेतला. त्यापैकी दोन मुलांची चित्रे प्रदर्शनासाठी निवडली गेली. नामांकित काळा घोडा कला महोत्सवातही विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून केवळ विद्यार्थी विकास, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन हाच विषय डोळ्यासमोर असल्यामुळे गेल्या तीन वर्षांत महापालिका शाळांचा कायापालट झाला आहे. त्यासाठी आकांक्षा फाउंडेशन व अन्य एनजीओ यांनी शिक्षण विभागाला केलेली मदत मोलाची ठरली आहे तसेच इतर सर्वांच्या योगदानातून, प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा भविष्यकाळातही सर्वांगीण विकास घडावा, अशी सदिच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com