पिस्तूलचा सुरक्षेऐवजी, दहशतीसाठी वापर

पिस्तूलचा सुरक्षेऐवजी, दहशतीसाठी वापर

Published on

पिंपरी, ता. १४ : आपल्या जिवाला धोका आहे, असे कारण दाखवून पिस्तूल परवाना घेतला जातो. मात्र, नंतर या पिस्तुलाचा स्वसंरक्षणाऐवजी दहशत माजविण्यासाठीच वापर होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पिस्तूल सुरक्षेसाठी की दहशत माजविण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एक हजार ४०० पिस्तूल परवानाधारक आहेत. यामध्ये स्वसंरक्षणासाठी पिस्तूल घेणाऱ्यांसह खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र, स्वसंरक्षणाच्या नावाखालीही पिस्तूल घेतल्यानंतर त्याचा गैरवापर होत असल्याचे समोर येते. ८ जुलैला बावधन येथे एका फार्म हाउसवर पार्टीच्या वेळी पिस्तूल परवानाधारक दिनेश बाबूलाल सिंग यांनी त्यांच्याकडील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला. त्याने उपस्थितांच्या जीवितास धोका निर्माण झाला. तसेच यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका कला केंद्र येथे २१ जुलैला पिस्तूल परवानाधारक गणपत जगताप यांनी त्यांच्याकडील पिस्तूल बेकायदारित्या इतर व्यक्तीला दिले. त्या व्यक्तीने हवेत गोळीबार केला. या दोघांचे पिस्तूल परवाने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतेच रद्द केले आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण याने कस्पटे कुटुंबियांना पिस्तूल दाखवून धमकाविल्याने पिस्तुलाचा कसा गैरवापर होतो, हे समोर आले होते. यांसह मागील काही दिवसांत बेकायदा पिस्तूलमधून गोळीबार झाल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बेकायदा पिस्तूल जप्त केल्या आहेत.

पिस्तूल परवाना मिळविण्याची प्रक्रिया
- शस्त्र मिळविण्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो.
- जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांना पिस्तूल परवाना देण्याचे अधिकार असतात.
- संबंधित अर्जदाराने दिलेले कारण तसेच त्याच्या जिवाला असणारी भीती याबाबत पडताळणी केली जाते.
- चौकशीअंती ठरावीक काळासाठी पिस्तूल परवाना मिळतो.
- वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करावे लागते.

गोळीबाराच्या घटना
- वराळे येथील एका कंपनीतील व्यवस्थापकावर दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
- देहूरोडमधील गांधीनगर येथे भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर सराईत गुन्हेगाराने पिस्तुलातून गोळी झाडून खून केला.
- चोरट्याने दुकानमालक तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्याने त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना पिंपरी कॅम्प येथे घडली.
- चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे एका तरुणाचा त्याच्याच मित्रांनी डोक्यात गोळी झाडून खून केला.
- नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणाला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. तरुणावर गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मावळ तालुक्यातील ओझर्डे येथे घडला.
- मद्यपान करण्यावरून झालेल्या वादात भावावर गोळीबार करण्याचा प्रकार पिरंगुट येथील सावकारवाडीत घडला.

‘‘सर्व बाबी तपासून तसेच रीतसर प्रक्रिया करूनच पिस्तूल परवाना दिला जातो. वेळोवेळी परवान्यांचे नूतनीकरण केले जाते. संबंधित शस्त्राचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करून पिस्तूल परवाना रद्दची प्रक्रिया राबविली जात आहे.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com