सिलंमब स्पर्धांत गैरप्रकाराची तक्रार
पिंपरी, ता. १५ : सिलंबम या पारंपरिक खेळाच्या विनाअनुदानित शालेय स्पर्धांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या खेळाची तांत्रिक माहिती नसलेल्या व्यक्तींना स्पर्धा आयोजनाची अनुमती देण्यात येते. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शालेय स्तरावर स्पर्धा घेण्यात येतात. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही खेळाडूंना जिल्हा किंवा विभागीय स्पर्धांत सहभागी नसूनही थेट राज्यस्तरीय स्पर्धांत प्रवेश दिला जातो. यामुळे पात्र खेळाडूंचे नुकसान होते. एकूणच संपूर्ण निवड प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पालकांनी याबाबत दिनांक सहा सप्टेंबर रोजी माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) माहिती मागवली होती, मात्र त्यावर अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. आरटीआय अर्जांचे ऑनलाईन क्रमांक एसइएएसडी/ए/२०२५/६०४२५ आणि एसइएएसडी/ए/२०२५/६०४२५ असे आहेत.
यासंदर्भात १२ नोव्हेंबर रोजी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयच्या बालेवाडीतील कार्यालयात पालकांनी पाठपुरावा केला. त्यावर ‘माहिती देणारे अधिकारी सध्या उपस्थित नाहीत, ते आल्यावर संपर्क साधा,’ असे उत्तर त्यांना मिळाले.
---
पालकांचे आरोप
- संयोजकांबाबत शहानिशा न करता स्पर्धा आयोजनाची काही संस्थांना परवानगी
- शासकीय स्पर्धांच्या आयोजनाचा गैरवापर
- प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव
- चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी
----

