औद्योगिक परिसराची सुरक्षा वाऱ्यावर

औद्योगिक परिसराची सुरक्षा वाऱ्यावर

Published on

पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक परिसरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील जवळपास २०० उद्योगांमध्ये नियमित अग्निसुरक्षा तपासणीची (फायर ऑडिट) सक्ती नाही. परिणामी सुरक्षा उपाययोजना वाऱ्यावर असल्याचे उघड झाले आहे.
सध्याच्या नियमावलीनुसार केवळ नवीन उभारण्यात येणाऱ्या कंपनी किंवा चालू उद्योगातील नव्या वाढीव विभागाची सुरवात करताना अग्निशामक विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे. जुन्या तसेच कार्यरत असलेल्या उद्योगांसाठी दरवर्षी अग्निसुरक्षा तपासणी अनिवार्य नाही.
अनेक ठिकाणी वीजपुरवठ्याशी संबंधित यंत्रणा, उपकरणे, वायरिंग किंवा वितरण पॅनेल्स जीर्ण अवस्थेत आहेत. तपासणी होत नसल्याने त्यांचा वापर सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची चिंता व्यक्त होत आहे. अशा यंत्रणांमधून आग लागण्याची शक्यता वाढते. तरीही नियमावलीत वार्षिक तपासणीची तरतूद नसल्याने संभाव्य धोका वाढण्याची भीती तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अग्निशामक विभागाने मोठे, मध्यम आणि लघु असे उद्योगांचे वर्गीकरण करून स्वतंत्र सुरक्षा नियम ठरवले आहेत. प्रत्यक्षात कंपन्यांनी स्वतःहून अर्ज केला तरच विभागाचे पथक तपासणीसाठी भेट देतो. कंपन्यांच्या स्वतःच्याच पातळीवर सुरक्षितता अवलंबून आहे. अशावेळी अनेक उद्योग या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात, अशी कबुली अधिकारीच देतात.
दरम्यान, वाढत्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज अनिवार्य झाली आहे. वार्षिक अग्नीसुरक्षा तपासणी सक्तीची करावी, जुन्या वीज यंत्रणांची तपासणी, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन साधनांची उपलब्धता आणि कर्मचारी प्रशिक्षण यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी औद्योगिक क्षेत्रातूनही होत आहे. शहरातील उद्योगांची सुरक्षा ही संपूर्ण परिसराच्या सुरक्षेशी निगडित असल्याने नियमावलीत तातडीने बदल करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

आगीच्‍या यापूर्वीच्या काही दुर्घटना
- २०२३ ः तळवडेतील फटाक्ं‍याच्‍या कारखान्‍यात १२ जणांचा मृत्‍यू
- निगडी सेक्टर नंबर २२ मधील दळवीनगर पत्रा शेड परिसरातील भंगार दुकान पेटले
- २०२४ ः चिखलीतील कुदळवाडीतील आगीत भंगाराची सुमारे दिडशे दुकाने खाक
- तीन जून रोजी काळेवाडीतील कपड्यांचे दुकान, पेपर प्‍लेट बनविणाऱ्या कारखान्‍याला आग

ही घ्यावी काळजी
- मोठ्या कंपन्‍यांना पाण्याची एक लाख लिटर क्षमतेची टाकी बसविणे आवश्‍यक
- लहान कंपन्‍यांसाठी पाण्याच्‍या दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीची मर्यादा
- पाण्याचे तीन पंप हवे, एका डिझेल पंपाची गरज
- अग्निशमन उपकरणांची आवश्‍यकता
----
दरवर्षी कंपन्‍यांची अग्निशमन तपासणी करण्याची नियमात तरतूद नाही. तपासणी करण्याबाबत स्‍वतः अर्ज करण्याची जबाबदारी कंपन्‍यांची आहे. त्‍यानुसार तपासणी केली जाते. नवीन कंपन्‍या किंवा नवीन विभाग सुरू करताना कंपनीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागते.
- भरत कापसे, विभागीय अग्निशमन अधिकारी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com