स्पोर्टस क्लबचा प्रकल्प कागदावरच

स्पोर्टस क्लबचा प्रकल्प कागदावरच

Published on

पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड शहरातील पहिला बहुउद्देशीय स्पोर्टस क्लब नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारण्यात येणार, असा महापालिकेने गाजावाजा करून घेतलेला निर्णय कागदावरच राहिला आहे. दीड वर्षांत या आघाडीवर प्रगती झाली नसल्याने खेळाडू तसेच पालकांमध्ये नाराजी आहे.
शहरातील क्रीडापटूंची गरज पूर्ण करणाऱ्या प्रकल्पाबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासावरही परिणाम होत आहे. ‘जाहिरातीमधील प्रकल्प वास्तवात कधी उतरणार,’ असा प्रश्न खेळाडू उपस्थित करत आहेत. हा प्रकल्प शहराच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल, पण त्यासाठी महापालिका आणि शासनाने प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे.

घोषणा मोठी, काम शून्य
डेक्कन जिमखान्याच्या धर्तीवर शहरातील स्पोर्ट्स क्लब उभारण्याचा निर्णय शहराच्या क्रीडा विकासाला नवे वळण देणारा ठरू शकेल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने स्टेडियमचा विकास करून क्रीडा, संस्कृती व मनोरंजन या क्षेत्रांत संधींचे नवे मार्ग उघडण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात प्रकल्पासाठी निविदा, नकाशा तयारी किंवा प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.
---
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. व्यापक विकास योजना ः २६ एकर जागेचा विकास, स्टेडियम परिसराचे आधुनिकीकरण, क्रीडा व मनोरंजनाचे एकत्रित केंद्र, आधुनिक-आकर्षक वास्तुकला
२. बहुउद्देशीय स्पोर्टस क्लब ः शहरासाठी स्वतंत्र, सर्वसमावेशक क्रीडा संकुल, खेळाडू, नागरिक व क्रीडा संघटनांसाठी एकत्रित सुविधा
३. क्रीडा, सांस्कृतिक व व्यावसायिक सुविधा एका छताखाली ः शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, क्लब हाऊस, क्रीडा अकादमी
४. प्रस्तावित क्रीडा व आरोग्य सुविधा ः बॅडमिंटन, स्क्वॅश, टेनिसची कोर्ट, तरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खास भाग, व्यायामशाळा, आरोग्य क्लबसह संपूर्ण फिटनेस सुविधा
५. सामाजिक व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागा ः बँक्वेट हॉल, मीटिंग रूम्स, बिझनेस सेंटर, कार्ड रूम, रेस्टॉरंट्स व कॅफे
६. निवास व्यवस्था ः क्रीडापटू आणि आमंत्रितांसाठी निवासी खोल्या

--
खेळाडूंच्या अपेक्षा आणि प्रशासकीय मौन
महापालिकेने प्रकल्प जाहीर केला तेव्हा क्रीडा संघटना व खेळाडूंच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने अनिश्चितता वाढली. शासन किंवा महापालिकेने ठोस भूमिका न घेतल्याने क्रीडा क्षेत्राचा विकास थांबला आहे. शहरात क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, टेनिस, रोलबॉल अशा खेळांमधील सहभाग वाढत आहे. त्यामुळे मोठ्या क्रीडा केंद्राची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे, मात्र याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे.
---
सुविधांअभावी शहरातील अनेक खेळाडू प्रशिक्षणासाठी पुण्यात धाव घेतात. शहरात दर्जेदार स्पोर्ट्स क्लब असता तर प्रशिक्षण, स्पर्धा व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असत्या.
- सुमेध खंडारे, खेळाडू
...

हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com