

पिंपरी, ता. १५ ः पिंपरी-चिंचवड शहरातील पारंपरिक किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या दुकानांना वाढत्या ऑनलाइन विक्रीचा फटका बसत आहे. ऑनलाइन आकर्षक सवलती आणि सोयी मिळतात. त्यामुळे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदीकडे वळला आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेतील खरेदी-विक्रीत लक्षणीय घट झाली आहे.
त्यामुळे उत्पन्नावर थेट परिणाम होऊन गेल्या दोन ते तीन वर्षांत शहरातील किरकोळ विक्रीत सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पिंपरी कॅम्प ही पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील एक सर्वात मोठी आणि जुनी बाजारपेठ आहे. सुवर्णकार, किराणा, कापड, अन्नधान्य, पुष्प, मोबाईल, पादत्राणे, हार्डवेअर, कॉम्प्युटर, इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध वस्तूंच्या होलसेल आणि किरकोळ दुकानांच्या रांगा येथे पाहायला मिळत. ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारी बाजारपेठ असा लौकिक आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मावळ, मुळशी तसेच इतर तालुक्यांतील नागरिक खरेदीसाठी पिंपरी कॅम्पलाच पसंती देतात. पुण्यातील तुळशीबाग किंवा लक्ष्मी रोड बाजारात जाण्याची इच्छा असली तरी वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक पर्याय म्हणून पिंपरी कॅम्पात येऊन खरेदी करतात. येथे परवडणाऱ्या दरात विविध वस्तू आणि प्रचंड वैविध्य उपलब्ध असल्याने ही बाजारपेठ लोकप्रिय ठरली, मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. अनेक दुकानदारांना उत्पन्न घटल्यामुळे खर्च भागविणे कठीण झाले आहे. काहींना कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली आहे. यासह चिंचवड, पिंपळे सौदागर, निगडी आणि भोसरी या भागातील बाजारपेठांमध्ये भाडे आणि वीजदर वाढल्याने खर्चात भर पडली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा नफा कमी झाल्याने नव्या दुकानांच्या उभारणीचा वेगही मंदावला आहे.
---------
दुकानदारांनी हे करावे
- स्थानिक स्तरावर ऑनलाइन ऑर्डर व दुकानातून डिलिव्हरी सेवा सुरू करावी
- गुगल मॅप आणि व्हॉट्सअॅप बिझनेसवर नोंदणी करून ग्राहकांशी संपर्क ठेवावा
- आसपासच्या भागात एकत्रित होम डिलिव्हरी सेवा सुरू करावी
- कॉल करा आणि मिळवा अशी जलद वितरण सेवा द्यावी
- कोणत्या वस्तूंची मागणी वाढत आहे हे डेटा विश्लेषणाद्वारे समजून घ्यावे
- त्या अनुषंगाने स्टॉक आणि सवलती ठरवाव्यात
-----------
शहरातील नोकरदार ऑनलाइन खरेदी करतात. त्यामुळे व्यापारावर सुमारे ३५ ते ४० टक्के घट जाणवते. ग्रामीण भागातील ग्राहक आजही आमच्यासोबत आहे. दर्जेदार वस्तू आणि विश्वासार्हता जपत आम्ही हे नाते टिकवून ठेवत आहोत.
- मनोज चावला, व्यापारी
-------
व्यापारी चढ्या दराने माल विकतात. त्यातही सेकंड कॉपी किंवा दुय्यम दर्जाच्या वस्तू मिळतात. ब्रॅंडेड कंपनीच्या संकेतस्थळावरून खरेदी केल्यास तीच वस्तू कमी दरात मिळते. कंपनीबरोबरच व्यवहार होत असल्याने फसवणूक होत नाही.
- आकाश जाधव, ग्राहक
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.