दोन लाखांहून अधिक कार्डधारकांचे धान्य बंद
पिंपरी, ता. १६ : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील तब्बल दोन लाख २२ हजार ६१६ शिधापत्रिकाधारकांना यंदाच्या सूचीबद्ध प्रक्रियेनुसार धान्य मिळणार नाही. ५९ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न दाखविणाऱ्या या कुटुंबांचे धान्य वितरण थांबविण्यात आले आहे.
याचा परिणाम एकूण सात लाख १३ हजार ६७८ नागरिकांवर होईल. गेल्या काही महिन्यांपासून सरकारने शिधापत्रिका तपासणी आणि पात्रता पुनर्मूल्यांकन मोहीम सुरू केली आहे. यात उच्च उत्पन्न दर्शविणाऱ्या केशरी कार्डधारकांना धान्य वितरण बंद करण्यात आले. वार्षिक उत्पन्न ५९ हजार पेक्षा कमी असलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित केले जाते. त्या पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून रद्द केला आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी कार्यालयांतर्गत एकूण सात लाख १३ हजार ६७८ शिधापत्रिकाधारकांचा यामध्ये समावेश होत आहे. त्यामध्ये पिंपरी विभागात ७२ हजार २५६, चिंचवडमध्ये ८२ हजार ५६१, तर भोसरी विभागात ६७ हजार ७९९ शिधापत्रिकाधारकांचे लाभ थांबविण्यात आले आहेत.
अनेक नागरिक आरोग्यविषयक शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून केशरी शिधापत्रिका कायम ठेवतात. त्यासाठी ते एक लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचे हमीपत्र देतात. पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील तीन प्रमुख कार्यालयांत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या पात्रता तपासणीचा मोठा परिणाम दिसून आला.
कार्यालयनिहाय स्थिती
विभाग ः कार्डधारक ः नागरिकांची संख्या
पिंपरी ः ७२ हजार २५६ ः २ लाख ३९ हजार १२३
चिंचवड ः ८२ हजार ५६१ ः २ लाख ६२ हजार ५२
भोसरी ः ६७ हजार ७९९ ः २ लाख १२ हजार ५०३
----
वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांना शासन नियमानुसार धान्य बंद होते. काही जण ५९ हजार ते एक लाख पर्यंतचे उत्पन्न असल्याचे हमीपत्र देतात. त्यांची शिधापत्रिकाधारक केशरी आहे.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड
-----

