गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

पिंपळे सौदागर येथे सलून चालकावर कुऱ्हाडीने हल्ला

पिंपरी : ‘‘हिशेब करून कामाचे पैसे द्या,’’ असे म्‍हणत कामगाराने दुकान मालकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्‍ला केला. ही घटना पिंपळे सौदागर येथील एका सलून दुकानात घडली. दुकान मालक फिरोज कासिम सलमानी (रा. पिंपळे सौदागर) हे यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजकुमार रामप्यारे राम (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिरोज यांच्या सलून दुकानात राजकुमार कामाला होता. त्याने पगाराचा हिशेब मागत वाद घातला. हा वाद वाढत गेल्यावर आरोपीने दुकानातील कुऱ्हाडीने सलमानी यांच्यावर वार केला.

जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकास २१ लाख ७० हजारांचा गंडा घालण्यात आला. ही घटना पिंपळे निलखमधील विशालनगर येथे घडली. या प्रकरणी अजय नामदेव सावरे (रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना दोन महिलांनी संपर्क साधून त्यांच्या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, नंतर परतावा दिला नाही.

बसच्‍या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पिंपरी : खासगी बसने दिलेल्या धडकेत ज्ञानदेव गणपत निकम (वय ७८, रा. खताळवस्‍ती, शिवाजीवाडी, मोशी) यांचा मृत्यू झाला. ही घटना मोशीतील भारतमाता चौकात घडली. या प्रकरणी त्‍यांचा मुलगा संजय यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश दगडू औटी (वय ४३, रा. रामनगर, वारजे माळवाडी) याच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. ज्ञानदेव निकम हे भारतमाता चौक येथून पायी जात असताना खासगी बसने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चिखलीतील जाधववाडी रोड येथे करण्यात आली. संतोष गोकुळदास तांबे (वय ४५, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गणपत मूर्तीवाला (रा. चासगाव, ता. आंबेगाव, पुणे) याच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. आरोपी संतोष तांबे हा गांजा घेऊन फिरत असताना त्‍याला ताब्यात घेत त्याच्याकडून २५४ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाइल असा एकूण एक लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तांबे याने हा गांजा गणपत मूर्तीवालाकडून आणला होता.

रिक्षाच्‍या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
पिंपरी : रिक्षाने धडक दिल्याने पादचारी महिलेला मृत्‍यू झाला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. शांताबाई रोहिदास कांबळे (वय ५४) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्‍यांचा मुलगा गणेश रोहिदास कांबळे (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद लक्ष्मण गायकवाड (रा. भिमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव) याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे. शांताबाई या पिंपळे गुरवमधील बॅक ऑफ महाराष्‍ट्रजवळील रस्‍ता ओलांडत होत्‍या. त्‍यावेळी रिक्षाने त्यांना धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com