पिंपरी, थेरगावमध्ये पीएमपी बसला आग

पिंपरी, थेरगावमध्ये पीएमपी बसला आग

Published on

पिंपरी, ता. १६ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसला आग लागल्याच्या दोन घटना रविवारी (ता. १६) घडल्या. पिंपरीतील चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरविल्याने अनर्थ टळला. थेरगावमध्ये नादुरुस्त बस आगारात नेताना आग लागली. बसमध्ये प्रवासी नव्हते. दोन्ही घटनांत बसचे बरेच नुकसान झाले.
रविवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पिंपरी-भोसरी या मार्गाची बस पिंपरीतून निघाली होती. बसमध्‍ये १५ प्रवासी, वाहक आणि चालक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील थांबा घेतल्‍यानंतर बस नेहरूनगरच्‍या दिशेने जात असताना लोखंडे कामगार भवनासमोर बसच्‍या इंजिनमधून धूर निघत असल्‍याचे चालकाच्‍या लक्षात आले. त्याने बसचे दोन्ही दरवाजे उघडून प्रवाशांना धोक्‍याची सूचना देत उतरण्यास सांगितले. चालक उतरताच बसने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. याबाबत अग्‍निशामक दलाला माहिती दिल्यानंतर एक बंब घटनास्‍थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
थेरगाव येथील सोळा नंबर बस थांबा येथील सोनाई मंगल कार्यालयाजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास एक बस पेटली. ही बस मनपा ते आकुर्डी रेल्वे स्थानक मार्गाची आहे. मनपा स्थानकावरून निघाल्यानंतर काही अंतरावर बस बंद पडली. त्यामुळे चालकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर रिकामी बस निगडी आगारात नेताना सोनाई मंगल कार्यालयाजवळ इंजिनमधून धूर येऊ लागला. काही वेळातच आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
------------------

बघ्यांची गर्दी; कोंडी

पिंपरी आणि थेरगाव येथील परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या. ही वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com