भाऊसाहेब भोईर लेख

भाऊसाहेब भोईर लेख

Published on

वर्धापन दिन लेख

उद्योगनगरीला
वारसा नाट्य परिषदेचा

उद्योगनगरीत कला वृद्धिंगत होत गेली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेची स्थापना झाली. सांस्कृतिक चळवळ घराघरांत पोहोचत आहे. ‘कलाकार कट्टा’ स्थापन केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सांस्कृतिक वृद्धी होत आहे. विविध कला क्षेत्रांतील सर्वांना एकाच छताखाली एकत्र आणून त्यांच्या कलाकृतींना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध आहे.
- भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा

पिं परी चिंचवड शहराची जडणघडण स्थापनाच ही मुळात पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीकरणातून झाली. यातूनच प्रथम नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका आकारास आली. या पाच ग्रामपंचायतींपैकी चिंचवड हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या आधीपासूनच प्रगल्भ शहर. धोंडिबा सायकर, सिद्ध्ये गुरुजी, पंडित पद्माकर कुलकर्णी, धोंडीबा चिंचवडे, मधू जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी या भूमीला संगीत आणि नाट्य क्षेत्राचा समृद्ध वारसा मिळवून दिला. नंतरच्या काळात नादब्रह्म परिवार व इतर कलाकारांसोबत इतर नाट्य व कला चळवळींमुळे अनेक कलावंत या शहरात वास्तव्यास आले, स्थायिक झाले आणि उद्योगनगरीत कला वृद्धिंगत होत गेली. या सर्व सांस्कृतिक पायाला व्यापक आणि संस्थात्मक स्वरूप देण्याच्या उद्देशाने ८ ऑगस्ट १९९६ ला शहरात शरद पवार यांच्या शुभहस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेची स्थापना झाली. त्या कालखंडात पंडित पद्माकर कुलकर्णी यांच्यासारखे ज्येष्ठ व्यक्ती नाट्य परिषदेवर होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शाखेची विश्वासार्हता वाढली. माझी नाट्यक्षेत्राशी ओळख शालेय जीवनापासून झाली. त्यानंतर माझे दिवंगत मित्र दत्ता मिरजकर, विजय जोशी यांनी मला या क्षेत्रात मोठे मार्गदर्शन केले. त्यावेळी पुणे शाखेचे तत्कालीन अध्यक्ष चित्तरंजन बापू कोल्हटकर, नाट्य परिषदेचे सुहास जोशी, नरेंद्र आमले, किरण येवलेकर यासारख्या अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले.

ऐतिहासिक नाट्य संमेलन
पिंपरी चिंचवडची ओळख ही उद्योगनगरी अशी आहे. मात्र, शहराला ‘सांस्कृतिक नगरी’ म्हणूनही ओळख मिळावी; या ध्येयाने आम्ही काम केले. नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या स्थापनेनंतर अवघ्या तीन वर्षांत म्हणजेच १९९९ मध्ये ७९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला. नाट्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांनी हे संमेलन पिंपरी चिंचवडला दिले. त्यावेळी अजित पवार यांनी सर्व जबाबदारी स्वीकारली, तर प्रा. रामकृष्ण मोरे यांनी एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे सर्व कामात सहभाग घेतला. तत्कालीन प्रसिद्धी माध्यमांनी हे संमेलन ५० वर्षांतील सर्वात यशस्वी संमेलन असल्याचे नमूद केले. त्यानंतर शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मानही आम्हालाच मिळाला. या संमेलनामुळे शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गेल्या २२ वर्षांपासून आम्ही सातत्याने कै. राजा गोसावी बालनाट्य स्पर्धा, कृष्णकुमार गोयल यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ कै. चंद्रकला किशोरीलाल गोयल राम गणेश गडकरी करंडक एकांकिका स्पर्धा सुरू केल्या. त्याचबरोबर शिक्षकांसाठी व मुलांसाठी नाट्य शिबिरे घेतली जातात, बालनाट्य स्पर्धा, बालनाट्य शिबिर असे उपक्रम घेतले जातात. गौरी लोंढे यांचे बालनाट्य संदर्भात महत्त्वाचे योगदान असते. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा ‘आशा भोसले पुरस्कार’ सुरू केला. तसेच पिंपरी चिंचवड शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा क्षेत्रातील विविध कलाकारांचा गौरव केला जातो. यावेळी बालगंधर्व पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, अरुण सरनाईक पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार इत्यादी दिग्गजांच्या नावे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. याशिवाय, शहरात प्रथम ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाची सुरुवात आमच्याच माध्यमातून झाली. या उपक्रमास सुरुवातीच्या काळात अल्प प्रतिसाद मिळाला. कामगारनगरी असल्याने इथे फर्स्ट, सेकंड,
थर्ड शिफ्ट या शिफ्टमध्ये काम करणारे नागरिक असताना ‘पहाट’ हा काय प्रकार आहे. यासाठी आमच्यावर टीका झाली; पण आता गल्लीबोळात दिवाळी पहाट साजरी होत आहे. मात्र, यामुळे कलावंतांना रोजगार मिळत असून, सांस्कृतिक चळवळ घराघरांत पोहोचत आहे. नुकतेच पाच नोव्हेंबर (मराठी रंगभूमी दिनानिमित्त) शहरात ‘कलाकार कट्टा’ स्थापित करण्यात आला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सांस्कृतिक वृद्धी व्हावी. यासाठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, नाट्य, संगीत, लोककलावंत तसेच नृत्य कलावंत इत्यादी कला क्षेत्रांतील सर्व कलाकारांना एकाच छताखाली एकत्र आणून त्यांच्या कलाकृतींना वाव देण्यासाठी आणि त्यांना एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे.
(शब्दांकन ः अश्विनी पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com